तरुणाईने पथनाट्यातून मांडल्या स्त्रियांच्या व्यथा

एमपीसी न्यूज – स्त्री भ्रूण हत्येपासून ते आयटीसह अनेक क्षेत्रात काम करणा-या सुशिक्षित महिलांवर शहरांत होणारे अत्याचार आणि ग्रामीण भागात मुलगा-मुलगी, असा भेदभाव करीत मुलीकडे होणारे दुर्लक्ष अशा ‘ती’ च्या व्यथा मुलगी झाली हो…! या पथनाटयातून महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी मांडल्या.
निमित्त होते, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सशक्तीकरण या विषयावरील पथनाट्य आणि व्याख्यानाचे. यावेळी दीपस्तंभ या सामाजिक संस्थेच्या डॉ. वृषाली रणधीर, डिपीसीओइचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, संचालक डॉ. रणबीर भाटीया, सचिव उमा ढोले पाटील, प्रा. श्रीकांत जगताप, डॉ.आरती दंडवते, आदी उपस्थित होते. यावेळी नोकरीच्या ठिकाणी होणारे महिलांचे शोषण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वृषाली रणधीर म्हणाल्या की, महिलांसाठी केलेल्या विविध कायद्यांमुळे महिला सुरक्षित झाल्या असल्या तरीही महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत. अनेक वेळा महिला आपल्यावर होणा-या अत्याचाराविषयी मोकळेपणाने बोलत नाहीत आणि कायद्याचा आधार देखील घेत नाहीत. परंतु असे न करता त्यांनी अत्याचाराविरोधात पुढे यायला हवे आणि कायद्याचा योग्य वापर करायला हवा. यावेळी त्यांनी महिलांविषयक विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन केले.
उमा ढोले पाटील म्हणाल्या की, महिलांसाठी असणा-या कायद्याची माहिती देण्याकरिता मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन जीवनात तरुणींचे सक्षमीकरण केल्यास पुढील काळात येणा-या अडचणींचा त्या सामना करू शकतील. मुलींसोबतच मुलांनी देखील सामाजिक जीवनात वावरताना एक जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.