पिंपरी महापालिका सत्तारूढ पक्षनेतेपदी एकनाथ पवार यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्ताधारी बनलेल्या भाजपच्या गटनेतेपदी एकनाथ पवार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या आदेशानुसार शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी ही निवड केली आहे.

एकनाथ पवार हे प्रभाग क्रमांक 11, कृष्णानगर-कोयनानगर-अजंठानगरमधून निवडून आले आहेत. 2007 मध्ये ते भाजपचे स्वीकृत नगरसेवक होते. पवार यांनी भाजपचे शहराध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. एकनाथ पवार यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक भोसरी मतदारसंघातून लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

आता ते नगरसेवक म्हणून दुस-यांदा निवडून आले आहेत. महापालिकेतील आणि पक्ष संघटनेतील कामकाजाचा अनुभव पाहून भाजपने एकनाथ पवार यांची गटनेतेपदी निवड केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकनाथ पवार यांची गटनेतेपदी निवड केली.

पक्षाने प्रामाणिकपणाचे फळ म्हणून आपली गटनेतेपदी निवड केल्याचे, निवडीनंतर एकनाथ पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.