टेम्पो-मोटार धडकेत एक ठार; चार अल्पवयीन मुले गंभीर

चाकण-आळंदी रस्त्यावरील घटना; टेम्पो चालकास अटक 


एमपीसी न्यूज – चाकणहून आळंदीला जाण्यासाठी निघालेल्या मोटारीला चुकीच्या बाजूने आलेल्या टेम्पोची जोरदार ठोस बसून झालेल्या अपघातात मोटारीतील एक जण ठार तर चार अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.5) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. चाकण पोलिसांनी या प्रकरणी बेदरकारपणे टेम्पो चालविणाऱ्या चालकावर सोमवारी (दि. 6) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर बाबुराव लेवडे (वय 50, रा. आळंदी, देहूफाटा, ता.हवेली जि.पुणे), असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर एकनाथ ज्ञानेश्वर लेवडे (वय 13), निश्पू वैजनाथ नागरे (वय 14), चैतन्य सुरेश चव्हाण (वय 11) व नवनाथ बाबासाहेब पारधे (वय 14, सर्व जन सध्या रा. आळंदी, देहूफाटा, ता. हवेली जि.पुणे) ही चार अल्पवयीन मुले यात जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मोहन बाबुराव लेवडे (वय 42) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक वैजनाथ कैलास खाडे (वय 27, सध्या रा. आळंदी, मूळ रा. करंदवले, ता. पाटोदा, जि. बीड) याच्यावर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नऊच्या सुमारास आळंदी येथे विद्यार्थ्यांना धार्मिक अध्यात्मिक शिक्षण देणारे महाराज ज्ञानेश्वर लेवडे त्यांची झेन मोटार (क्र. एम एच 12 ए एन 9876) घेऊन आळंदी फाटा येथून आळंदीकडे जात असताना हॉटेल निवांत समोर अचानक भरधाव वेगात चुकीच्या बाजूने आलेल्या आयशर टेम्पोची (क्र. एम एच 09 सी यू 9000) मोटारीस जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, मोटारीच्या समोरील भागाचा चक्काचूर होऊन चालक ज्ञानेश्वर लेवडे हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले तर याच मोटारीत बसलेली चार अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाली.

पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव जाधव व त्यांचे सहकारी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.