शनिवार, डिसेंबर 3, 2022

रसिलाच्या खुनासारख्या घटना टाळण्यासाठी पुणे शहर पोलिसांचा बडीकॉप उपक्रम

भविष्यात SOS हे अॅप सुरू करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – रसिला राजू ओ. पी. च्या खुनासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी बडीकॉप हा क्रांतीकारी उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रसिला राजू या इन्फोसिस कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तरुणीची काही दिवसांपूर्वी कंपनीच्या सुरक्षकाकडून हत्या करण्यात आली होती. अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी बडीकॉप हा क्रांतिकारी उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. ही संकल्पना ‘वॉक विथ सी.पी.’ या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासोबत दिनांक 7 फेब्रुवारीला पार पडलेल्या हिंजवडीतील कार्यक्रमात उदयास आली.

या उपक्रमांतर्गत महिला समाजात वावरत असताना कठीण प्रसंगी त्यांना मदत उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे. याअंतर्गत काम करणाऱ्या 40 महिलांमागे 1 बडीकॉप म्हणून पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. जर या महिलांना आपण संकटात आहोत, असे वाटले तर या महिला संबंधित बडीकॉपशी फोन, व्हॉट्स अॅप, ईमेलद्वारे संपर्क साधू शकतात.


याशिवाय भविष्यात SOS हे मोबाईल अॅप्लिकेशन सुरू करून महिलांच्या कामाच्या ठिकाणची सुरक्षितता उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Latest news
Related news