पुण्यात स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी; 66 दिवसात 7 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी एक रुग्ण दगावल्याचे समजते. 1 जानेवारीपासून काल (सोमवार) पर्यंत 6 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी दोघांचा मृत्यू काल झाला. त्यानंतर आज (मंगळवार) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुण्यात 66 दिवसात एकूण 7 रुग्णांचा स्वाईन फ्ल्यूने बळी घेतला आहे.
या 7 रुग्णांपैकी केवळ एक रुग्ण पुणे शहरातील आहे. तर बाकी सहाजण पुणे शहराबाहेरील असून ते पुण्यात उपचार घेत होते, अशी माहिती आरोग्य विभागकडून देण्यात आली आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्याचे काम आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. तसेच 1 जानेवारीपासून आज अखेर एक लाख 52 हजार 866 रुग्णांनी या आजाराची तपासणी केली. तर त्या दरम्यान 1 हजार 469 संशियत आढळल्याने त्यांना टैमी फ्लूच्या गोळ्या देऊन उपचार सुरु करण्यात आले. मागील दोन महिन्याच्या काळात 4 रुग्णांचा स्वाइन फ्लू ने तर काल दोन रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
यामुळे शहरातील नागरिकांनी या आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळील रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचे 3 बळी
पुण्या प्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही स्वाईन फ्लू मुळे रुग्ण दगावले आहेत. यामध्ये 1 जानेवारीपासून आजपर्यंत (दि.7 मार्च) एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत 35 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 11 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आज अखेर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.