सापांच्या मृत्यूप्रकरणी डॉ. गोरे यांची होणार खातेनिहाय चौकशी

महापालिका आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्राहलयातील 20 सपांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश गोरे यांना दोषी धरले आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी डॉ. गोरे विरोधात आज (शुक्रवारी) खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.

बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील 20 सापांचा 20 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख म्हणून कारभार पशुवैद्यकीय डॉ. गोरे यांच्याकडे देण्यात आला होता. नगरसेवक व नागरिक व सर्पमित्रांच्या तक्रारीनंतर महापालिका आयुक्तांनी गोरे यांच्या विरुद्ध द्वि सदस्यीय समितीची नेमणूक केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात पशुवैद्यकीय अधिकारी या पदास व्यवसाय भत्ता अनुज्ञेय नसतानाही डॉ. गोरे यांनी अनधिकाराने महापालिकेकडून भत्ता घेतला, पशुवैद्यकीय लेखापरीक्षणात उपस्थित आक्षेपांची पूर्तता केली नाही. तसेच सारथीद्वारे आलेल्या तक्रारींची दखल न घेता त्या परस्पर दप्तरी दाखल करणे, असे गंभीर बाबी या अहवालात नमुद केल्या होत्या.

तसेच 9 डिसेंबर रोजी सादर केलेल्या अहवालात संपूर्ण साडेसात एकर जमीनीवरील या सर्पोद्यानात केवळ तीन मजूर कार्यरत होते तर त्यासाठी सुरक्षारक्षकही कमी आहे. सापांचे अन्न, त्यांच्या निवासाची देखभाल, किती साप सर्पोद्यानात आले आदींची कोणतीच लेखी नोंद कर्मच्या-यांकडे नाही. सापांची देखभाल करायला कोणीही प्रशिक्षित व्यक्ती सर्पोद्यानात नाही. सर्पोद्यानासाठी आठ सर्पमित्र नेमले मात्र त्यातील दोन केवळ सर्पोद्यानात असतात तर सहा पशुवैद्यकीय दवाखान्यात असतात.

सर्पोद्यानातील कर्मचारी व सर्पमित्रात आपआपसात मतभेदही असल्याचे उघड झाले.

सर्पोद्यानात आणलेले साप एका काचेच्या पेटीत ठेवले जातात. मात्र, यावेळी बारा दिवस उलटले तरी त्यांचे वर्गीकरण केले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तर सर्पोद्यानाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखाच्या घरात आहे. मात्र, खर्च हा अनिर्बंध असल्याचेही उघड झाले आहे. तर दुस-या बाजूला उद्यानाचा मुख्य उद्देश बाजूला राहत असून तेथे प्रेमी युगुलांचा अड्डा बनत आहे, तर दारुच्याही पार्ट्या परिसरात झडत असल्याचे समोर आले आहे. तर दरम्यान मगरीची पिल्लही चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्याने इतर प्राण्यांची सुरक्षाही धोक्यात असल्याचे चित्र आहे.

साप वन क्षेत्रात सोडताना वन विभागाशी कोणाताही संवाद किंवा संपर्क होत नसल्याची तक्रारही वनविभाग अधिका-यांनी केली आहे. डॉ. सतिश गोरे यांना हा पदभारही डोईजड होत असून त्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित व्यक्तीच नेमणे योग्य आहे, असे निष्कर्ष मांडले होते.

याबाबत गोरे यांनी समाधानकारक खुलासा केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी गोरे सर्वस्वी या प्रकरणाला जबाबदार असून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी तसेच 15 दिवसात दोषारोपत्र ठेवण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी आज काढले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.