पर्रिकरांच्या राजीनाम्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्न लांबणीवर?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण खात्यासंदर्भातील प्रलंबित प्रश्न संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या माध्यमातून सुटण्याची शहरवासीयांना आशा होती, मात्र गोव्यातील राजकीय परस्थितीमुळे पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहरातील संरक्षण खात्यासंदर्भातील प्रलंबित प्रश्न लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 


शहरातील रेडझोनचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तळवडे, रुपीनगर, चिखली हा पट्टा रेडझोनच्या हद्दीत येतो. बोपखेल आणि पिंपळे-सौदागर येथील रक्षक चौकातील रस्ता लष्कराने सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण खात्यासंदर्भातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मनोहर पर्रिकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. 

शरद पवार यांच्यानंतर मराठी बोलणारे मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्री झाले होते. शरद पवार हे अडीच वर्ष देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यांनाही अचानक महाराष्ट्रात परतावे लागले होते. मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अडीच वर्षापूर्वी देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची शपथ घेतली होती. गोव्यातील राजकीय तिढ्यानंतर त्यांना पुन्हा गोव्यात परतावे लागले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मनोहर पर्रिकर  शहरात आले होते. लष्कराच्या हद्दीतील रस्त्त्याच्या समस्या कॅन्टोमेंट बोर्डामुळे आहेत. बोपखेलचा रस्ता बंद आहे. नागरिकांना रहदारीसाठी तो रस्ता खुला करण्यास सरकार सकारात्मक आहे. आता निवडणूक सुरु आहे. त्यामुळे मला कोणतेही आश्वासन देता येत नाही. 27 फेब्रुवारीला तुमच्यापैकी कोणीही एकजण दिल्लीला या, संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्न सोडवितो, असे पर्रिकर यांनी सांगितले होते. 

पर्रिकर यांच्यामुळे शहरातील नागरिकांना रेडझोनसंदर्भातील प्रश्न सुटतील अशी, अपेक्षा होती, मात्र पर्रिकर यांनी संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे शहरातील प्रश्न कधी आणि कोण सोडविणार, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. 

पर्रिकरांचा राजीनामा रेडझोनग्रस्तांसाठी दुर्दैवी – गुलाबराव सोनवणे

पर्रिकर यांच्या माध्यमातून रेडझोनचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा होती. त्यांनी रेडझोनचा प्रश्न समजावून घेतला होता. महापालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी  प्रश्न सोडविण्याचे, आश्वासन दिले होते. मराठी असल्यामुळे त्यांना प्रश्नाची जाण होती. देहूरोड परिसर त्यांना माहित होता. 

शरद पवार यांच्यानंतर दुसरे मराठी बोलणारे संरक्षणमंत्री झाले होते. पर्रिकर यांनी रेडझोनचा प्रश्न सोडवूनच पदाचा राजीनामा दिला पाहिजे होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे आमच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे, असे रेडझोन संघर्ष समितीचे सहसचिव गुलाबराव सोनवणे ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.