पुणे विद्यापीठातून नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण; पोलीस म्हणतात माहितीच नाही

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम करणा-या सुरक्षारक्षकाच्या 9 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. परंतू हा सर्व प्रकार घडलाच नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. याविषयी चतुःश्रृंगी पोलिसांनाही काहीच माहिती नव्हती. वरिष्ठ निरीक्षकांनीही याविषयी मला देखील पत्रकारांकडूनच कळल्याचे सांगितले. त्यामुळे नेमकी ही घटना घडली की पोलीस व विद्यापीठ प्रशासन हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मात्र कळण्यास मार्ग नाही. हा सर्व प्रकार गुरुवारी रात्री घडला होता.

विद्यापीठातील परीक्षा विभागात सूर्यकांत तूपकर हे सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस आहेत. विद्यापीठातील सुरक्षारक्षकांच्या वसाहतीमध्ये ते राहण्यास आहेत. त्यांना एक मुलगी व नऊ वर्षांचा वरद हा मुलगा आहे.

दरम्यान, गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुलगा वरद हा विद्यापीठाच्या खडकी प्रवेशद्वाराजवळ मोठ्या बहिणीची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी अचानक एक काळ्या रंगाची कार त्याच्याजवळ आली व त्यातून उतरलेल्या अज्ञात लोकांनी पोत्यात घालून पळवले. दरम्यान, त्याची बहीण घरी आली. मात्र, वरद घरी न आल्याने आईने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो मिळून आला नाही. विद्यापीठ परिसरात त्याच्या कसून शोध घेतला. मात्र, तो मिळाला नाही. त्यानंतर आई व शेजारीच्या रहिवाशांनी शोध घेतला. मात्र, तो मिळत नसल्याने शेवटी त्यांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास विद्यापीठ पोलीस चौकीत धाव घेतली. त्याचवेळी तेथे एका अज्ञात मोबाईलवरून वरदच्या पालकांना फोन आला व त्यांनी वरद मिळाल्याचे सांगितले.

त्यानंतर विद्यापीठ पोलीस चौकीच्या पोलीस पुणे रेल्वेस्थान येथे गेले. त्यावेळी वरद रेल्वेस्टेशनमधील वॉशिंग सेंटरमध्ये रडताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.

दरम्यान, या घटनेमुळे विद्यापीठ परिसरासह पूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नेमके अपहरण झाले होते का, की विद्यापीठ व पोलीस प्रशासन घटना लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा विद्यापीठ परिसरात सुरू आहे. दरम्यान, वरद रात्री सुखरुप सापडल्याने त्याच्या आई-वडिलांकडून या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.