गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

डी. सी. डिझाईन कंपनीकडून पैसे देण्यास टाळाटाळ; कामगारांचा आरोप

वकिलामार्फत नोटीस देऊन धमकाविले जाते

पोलिसांकडे तक्रार देऊनही गुन्हा दाखल नाही

एमपीसी न्यूज – वाहन डिझाईन क्षेत्रातील अग्रगण्य अशा दिलीप छाब्रिया यांच्या मालकीच्या डी.सी. डिझाईन कंपनीच्या व्यवस्थापनाने मागील दोन वर्षांपासून कामाचा मोबदला दिलेला नाही, असा गंभीर आरोप काही ठेकेदार व कामगारांनी  केला आहे. पैसे मागण्यासाठी गेल्यास धमक्या दिल्या जातात तसेच पोलिसांकडे तक्रार देऊनही गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे.

‘डीसी अवंती’ या पहिल्या स्पोर्ट्स कारच्या निर्मितीबरोबरच विविध मान्यवर नेते, अभिनेते यांच्यासाठी विशेष वाहनांचे, रथांचे डिझाईन बनवून जगभर नावलौकिक मिळणा-या दिलीप छाब्रिया यांची चिंचवड स्टेशन येथे डी. सी. डिझाईन नावाची कंपनी आहे. अलिशान वाहनांची डिझाईन करणारी अशी या कंपनीची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. कंपनीने नुकतीच भारतीय बनावटीच्या ‘डीसी अवंती’ पहिली स्पोर्ट्स कार तयार केली होती. अनेक दिग्गज कलाकार, राजकारण्यांच्या मोटारीवर डिझाईन करण्याचे काम या कंपनीत केले जाते. अशा प्रसिद्ध असलेल्या कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांची पिळवणूक केली जात असल्याची माहिती पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

या कंपनीत ठेकेदार असलेले राकेश जांगीड यांचे गेल्या दोन वर्षांपासूनचे पैसे थकले आहेत. जांगीड हे वाहनांच्या सीटचे फ्रेम बसविण्याचे काम करत होते. मागील दोन वर्षापासूनचे जांगीड यांचे तब्बल 6 लाख 86 हजार रुपये कंपनीकडे थकले आहेत. कंपनीचे एच. आर. विभागाचे व्यवस्थापक विजय मंचेकर यांच्याकडे त्यांनी वारंवार पैसे देण्याची मागणी केली, मात्र पैसे देण्यास नकार दिला जात आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आणखी एखाद्या गुन्ह्याने काय फरक पडणार आहे, असे व्यवस्थापक मंचेकर सुनावतात, असे जांगीड यांनी सांगितले.

फायबर मोल्डिंगचे काम करणारे कमलेश यादव यांचे दोन वर्षांचे 4 लाख 46 हजार रुपये थकले आहेत. पाच वर्ष त्यांच्याकडून सेवाकराची बिले घेतली आहेत. प्रत्यक्षात सेवाकराची रक्कम अदा केली गेली नाही अथवा सरकारकडेही जमा केली नसल्याचा आरोप यादव यांनी केला आहे.

इलेक्ट्रीशियन म्हणून काम करणा-या सतेंद्र प्रजापती यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे (पीएफ)  50 हजार रुपये थकले आहेत. पाच वर्षांपासून ते कंपनीत काम करत होते. दर महिन्याला त्यांच्या पगारातून पीएफची रक्कम कापली गेली आहे. मात्र ती रक्कम पीएफ कार्यालयात भरली नाही, असा आरोप प्रजापती यांनी कंपनीचे व्यवस्थापक विजय मंचेकर यांच्यावर केला आहे. 

पैसे मागण्यासाठी गेल्यावर मंचेकर हे वकिलामार्फत नोटीस देऊन धमकावत आहेत. तुम्हीच कंपनीचे नुकसान केले आहे. त्यासाठी कंपनीला भरपाई देणे आवश्यक आहे. तरी तुम्ही मला पैसे मागू नका, मी तुम्हाला पैसे मागत नाही, अशी टोलवाटोलवी करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला. 

याबाबत ठेकेदार, कामगारांनी पिंपरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या मोहननगर पोलीस चौकीत 3 फेब्रुवारी 2017 रोजी तक्रार दिली आहे. एच.आर. विभागाचे व्यवस्थापक विजय मंचेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची त्यांनी  मागणी केली होती. कोर्टाचा विषय असल्याचे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचेही जांगीड यांनी सांगितले.

पोलिसांनी मंचेकर यांना समज देऊन चौकशीसाठी बोलावून घेतले होते. पोलीस ठाण्यात चौकशीसाठी येण्यासाठी पोलिसांकडून त्यांना अधिक कालावधी दिला जातो, याचे गौडबंगाल काय आहे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मंचेकर हे पोलिसांना खोटी कागदपत्रे दाखवित आहेत. कामगारांचे पैसे थकले नसल्याचे सांगतात. कामगार विमा योजनेचे पैसे कापून घेतले आहेत, मात्र त्याची कोणतीही कागदपत्रे दिली नसल्याचा आरोप कामगारांनी केला.

दरम्यान, डी.सी. डिझाईन कंपनीच्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच कंपनीच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही कामगारांनी दिला आहे.

यासंदर्भात कंपनीतील उत्पादन व्यवस्थापक संजीव सिंह यांच्याशी संपर्क साधला असता, आपण संबंधित बिले काढून एचआर विभागाकडे पाठविली असल्याचे सांगितले. त्यानंतर मनुष्यबळ विकास विभागाचे व्यवस्थापक विजय मंचेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. यासंदर्भात कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी संपर्क साधावा, असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

Latest news
Related news