सोलापूर ते तुळजापूर कोजागरी पौर्णिमेच्या रात्रीची पदयात्रा

सोलापुरात दसर्‍याचे विशेष महत्व असते. या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पूर्वी पारंपारिकपणे साजर्‍या केल्या जाणार्‍या उत्सवात आता दांडिया आल्यामुळे या उत्सवाला आता इव्हेंटचे स्वरूप आले आहे. विजयादशमीच्या दिवशी सोलापूरच्या पार्क मैदानावर असलेल्या शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालत, ’आई राधा उदे, उदे, सदानंदीचा उदे उदे!’ चा गजर करीत सीमो‘ंघन केले जाते. त्यानंतर घरोघरी जाऊन सोन्याच्या रूपातील आपट्याची पाने एकमेकांना देऊन दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या जातात. म्हणजे तो एक सोहळाच असतो. दसर्‍यानंतर येणार्‍या कोजागरी पौर्णिमेच्या रात्री सोलापूरहून लाखो भाविक तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जातात. सोलापूर, कर्नाटक, आंध‘ प्रदेश मधील भाविक मोठ्या सं‘येने सहभागी होतात. सोलापूर-तुळजापूर 48 किमी अंतर. सोलापुरात भवानी पेठेतील रूपा भवानी मातेचे दर्शन घेऊन भाविक तुळजापूरच्या दिशेने प्रयाण करतात. 
 
आयुष्याची बारा वर्षे सोलापूर शहरात काढली. शालेय शिक्षण या शहरातच झाले. परंतु या प्रवासाचा आनंद घेणे जमले नाही. यंदा मी ही पदयात्रा करण्याचे ठरवलेच आणि सोलापूरहून तुळजापूरच्या दिशेने प्रयाण केले. संध्याकाळी सहा वाजता चालण्यास सुरुवात केली. ही मोहीम हाती घेण्याचा माझा उद्देश फक्त आपली शारीरिक क्षमता अजमावण्याचा होता. कारण देव या संकल्पनेला मी माझ्यातून केंव्हाच हद्दपार केले आहे. देवापेक्षाही माणसाचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे या मतावर मी आलेलो आहे. त्यामुळे स्वतःच्या शरीरावर असलेला विश्‍वास आणखी दृढ करण्यासाठी मी या पदयात्रेमध्ये सहभागी झालो. माणसाने अधून मधून आपली शारीरिक क्षमता अजमावीत राहिले पाहिजे. विशेषतः पन्नाशीनंतर असे करणे अत्यंत गरजेचे आहे. असो. 
 
दोन दिवस सोलापूर-तुळजापूर या मार्गावरील सर्व वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजू गर्दीने फुलून गेल्या होत्या. अनेकजण अनवाणी निघाले होते. या गर्दीमध्ये तरुणांचा सहभाग जास्त पाहायला मिळाला. मात्र हु‘डबाजी, शिवीगाळ करीत ही पोरं सहभागी झाल्यामुळे या पदयात्रेचे पावित्र् नष्ट होऊन केवळ भटकंतीचे स्वरूप आले होते. एक महाभाग तर चक्क दारू पिऊन झिंगत निघाला होता. काही ठिकाणी मेणबत्तीच्या प्रकाशात जुगारही चालू होता. थोडक्यात, या पदयात्रेत कोणतीही शिस्त, पावित्र् आणि भक्ती पाहायला मिळाली नाही. रस्त्याच्या कडेला काही स्वयंसेवी संस्थांनी किंवा स्थानिक नगरसेवकांनी भाविकांच्या सोयीसाठी अन्नदानाचा उपक‘म सुरु केलेला होता. काही ठिकाणी पाणी वाटप, चहा वाटप सुरु होते. त्यामुळे जागोजागी प्लॅस्टिकच्या डिश, कप, पाण्याच्या बाटल्या यांचा खच झाला होता. 
 
पुण्यात येणार्‍या पालखी सोहळ्याचा आनंद मी घेतला आहे. या पालखीसोबत काही अंतर मी चाललो आहे. पण अशी बेशिस्त कधीच पाहायला मिळाली नाही. ज्ञानोबा माऊलीचा गजर करीत, टाळमृदंगाच्या तालावर भजन गात वारकरी शांतपणे जाताना पाहायला मिळतात. पण इथे मात्र पुण्यातील गणपती पाहायला निघाल्याचा अविर्भावात ही तरुण मंडळी जाताना पाहून वाईट वाटले. एवढेच काय मार्गाच्या कडेला बिअर बार आणि दारूची दुकाने सुद्धा होती. काही शौकीन मंडळी एक पेग मारून पुन्हा पदयात्रेत सामील होत होती. मी देवभोळा नाही; परंतु प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते. त्यावेळी माणसाने तसेच वागले पाहिजे. अशावेळी सुंदर भजन गात, देवाचा नामघोष करीत वाट चालायची असते. इथे तर आयुष्याची वाट लावण्याचे काम चालू होते. ते सुद्धा देवाधर्माच्या नावाखाली ! 
 
सोलापूरपासून निघताना उत्साह होता. त्यामुळे पावले वेगात पडत होती. साधारणपणे ताशी पाच किमीचे अंतर पार केले जात होते. सोबत कुणीच नसल्यामुळे विचारांच्या नादात रस्ता मागे पडत चालला होता. चालताना सोलापूरच्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. शालेय, महाविद्यालयीन जीवनातील गमती-जमती आठवून मी स्वतःशीच हसत होतो. पौर्णिमेचा चंद्र उगवला होता. रस्त्यावर टिपूर चांदणे पडले होते. त्या प्रकाशात सर्वजण निघाले होते. लांबून कुठूनतरी स्पीकरवरून भाविकांना महाप्रसादाचा आनंद घेण्याचा आग‘ह केल्याचा आवाज ऐकू येत होता. 
 

चालून चालून पाय दुखायला लागले की, रस्त्याच्या दुभाजकावर बसून थोडावेळ विश्रांती घ्यायची आणि पुढे चालू लागायचे. सोलापूरपासून 18 किमीवर उळे नावाचे गाव लागले. या गावाच्या अलीकडे असलेल्या पेट्रोलपंपावर अनेक भाविक विश्रांतीसाठी थांबले होते. रात्रीचे 10 वाजले होते. मी सुद्धा पेट्रोलपंपाच्या कट्ट्यावर अंग लोटून दिले. उशाला पाठीवरची सॅक घेऊन डोळे मिटून पडून राहिलो. हात पाय ताणून मस्तपैकी आळस दिला. आसपासच्या भाविकांच्या हेल काढून अस्सल सोलापुरी बोलण्याचे खूप हसू येत होते. सोलापूरला असताना माझी भाषा देखील अशीच होती. आजही सोलापूरच्या एखाद्या मित्राशी बोलताना नकळतपणे मी त्या स्टाइलने बोलतो. मजा येते. अर्धा तास विश्रांती घेतली आणि पुन्हा मार्गस्थ झालो. 
 
तासाभराने 5-6 किमी अंतरावरील तामलवाडी या गावात पोचलो. इथेही भाविकांचे वाजत गाजत स्वागत होत होते.  सोबत चक्क सिनेमातील गाणी वाजत होती. कोणा स्थानिक पुढार्‍याच्या वतीने महाप्रसाद, चहा वाटप चालू होते. एका स्वयंसेवी संस्थेतर्फे औषध वाटप सुरु होते. या ठिकाणी पायाला लावण्यासाठी एक मलम दिले जात होते. माझे पाय प्रचंड दुखत होते. मी ते मलम पायाला चोपडले. जवळच भाविकांच्या विश्रांतीसाठी ताडपत्री पसरली होती त्यावर झोपून गेलो. अर्धा पाऊण तास छान झोप काढली. चहा घेतला आणि पुढे निघालो.
 
आता मी 25 किमी म्हणजे निम्मे अंतर पार केले होते. रात्रीचे बारा- साडेबारा वाजले होते. चार-पाच किमी चालले की थोडावेळ बसायचे, डांबरी रस्त्यावर झोपून जायचे. उड्डाणपुलाच्या कठड्याला टेकून आराम करायचा. पायाला मालिश करायचे आणि मार्गस्थ व्हायचे. काही अंतर पार केल्यानंतर पाय उचलवेनात. एक पाउल पुढे टाकणे सुद्धा जमेना. मांड्या, पोटर्‍यांचे स्नायू चांगलेच पिळवटून निघाले होते. शेवटी एका घराच्या ओसरीवर मी झोपून गेलो. अर्धा तास झोप घेतली. एका ठिकाणी चहा घेतल्यावर बरे वाटले. पुन्हा वाटचाल सुरु. रात्रीचे दोन वाजले होते. या महामार्गाच्या रुंदीकरणाचे  काम चालू असल्यामुळे कुठेही मैलाचा दगड किंवा मार्ग फलक दिसत नव्हता. त्यामुळे नेमके किती अंतर राहिले हे काही कळत नव्हते.  
 
वाटेत भाविकांना अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. लोकही उत्साहात त्या गरम पाण्याचा आनंद घेत होते. होता होता पूर्वेकडे उजेड दिसू लागला. पाय न थकता पुढे पडत होते. लांब कुठेतरी तुळजापूरचा घाट दिसतो आहे का याचा मी अंदाज घेत होतो. एका माणसाला विचारले अजून किती अंतर आहे हो ? मला वाटलं, चार-पाच किमी राहिले असतील. तर त्याच्याकडून उत्तर आलं, आजून मोप लॅब जायाचं हाय. 15-20 किलोमीटर बापरे! कधी पोचणार आपण? असा विचार करत मी निघालो. आता चालत जाण्याशिवाय गत्यन्तर नव्हते. सकाळचे कोवळे ऊन पसरले होते. हवेत गारवा होता. 
 
अखेर साडेआठ वाजता तुळजापूरच्या घाटाच्या पायथ्याशी पोहोचलो. या ठिकाणी दर्शनबारीसाठी भाविकांची रांग लागली होती. मला दर्शन घ्यायचे नव्हते. त्यामुळे मी तुळजापूर गावाच्या दिशेने निघालो. घाटाच्या सुरुवातीलाच रिक्षा थांबलेल्या दिसल्या. माणसाच्या मनाची गम्मत पहा, जोपर्यंत कोणतेही वाहन दिसत नव्हते तोपर्यंत मी मुकाट्याने चालत होतो. पण आता रिक्षा दिसल्याबरोबर मन म्हणाले, बास झाले आता. भरपूर चाललास! आता रिक्षा कर आणि पुढे जा  मी मुकाट्याने रिक्षात बसलो आणि तो तीन किमीचा घाट पार करून मी माझ्या इच्छित स्थळी दाखल झालो. प्रवास तर उत्तम झाला. पण वाटेतील अस्वच्छता पाहून पुन्हा या मार्गावरून जाण्याची इच्छाच मरून गेली. 
 
56 व्या  वर्षी अजूनही तोच स्टॅमिना माझ्यामध्ये आहे याचे समाधान वाटले. मी नेहमी म्हणतो की, परमेश्‍वराने आपल्याला हे शरीर भाड्याने दिले आहे. ते अखेरपर्यंत तंदुरुस्त ठेवून जसे घेतले त्याच अवस्थेत ते परमेश्वराला परत करणे हे आपले कर्तव्य नाही का? 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.