Pune : लीला पुनावाला फाउंडेशनने केला शूर जवानांचा सन्मान

एमपीसी न्यूज – आपल्या परिवारापासून दूर राहून स्वतःचे आयुष्य पणाला लावत नागरिकांचे रक्षण करणा-या आपल्या शूर जवानांचा लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. युद्धादरम्यान जखमी होऊन अपंगत्व आलेल्या शूर सैनिकांसाठी भाऊबीजेच्या मुहूर्तावर पीस अम्बॅसिडर्स म्हणजेच लीला पुनावाला फाउंडेशनच्या लीला गर्ल्स आणि फेलोजने मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

युद्धादरम्यान जखमी झालेल्या जवानांवर केंद्रित असलेला हा कार्यक्रम देशभक्तीने दुमदुमला होता. देशभक्ती व प्रादेशिक गीत गाऊन मुलींनी भारतीय संस्कृतीच्या विविध छटांवर प्रकाश टाकला. मुलींनी भारत रत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत सादर करताच उपस्थित लोकांना गहिवरून आले.

कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या आणि शैक्षणिक दृष्ट्या हुशार मुलींना शिक्षणासाठी मदत करत सक्षम केल्याबद्दल ब्रिगेडिअर एच.एस. अगरवाल (एमएस, डी ऑर्थो, फेलो आर्थोप्लास्टी, जर्मनी) यांनी लीला पुनावाला फाउंडेशन आणि फिरोज पुनावाला यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला. फाउंडेशनतर्फे सीमेवर देशाचे रक्षण करताना जखमी झालेल्या व अपंगत्व आलेल्या सैनिकांचे पुनर्वसन करून त्यांना एक नवीन आयुष्य दिल्याबद्दल मिलिटरी हॉस्पिटलचे ब्रिगेडिअर एच.एस अगरवाल व त्यांच्या कर्मचारी वर्गाचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जे सैनिक या कार्यक्रमासाठी येऊ शकले नाहीत त्यांना लीला पुनावाला आणि पीस अम्बॅसिडर्स यांनी खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जाऊन या सैनिकांना भेटून त्यांची चौकशी केली आणि त्यांना 350 खाऊपुड्यांचे वाटप केले. सैनिकांना मानवंदना देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.