Pimpri : महापालिकेच्या उत्पन्नात 21 टक्यांनी वाढ; बांधकाम परवानगीतून सर्वाधिक उत्पन्न 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2019-2020 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात विविध विभागाच्या माध्यमातून 21 टक्के उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक बांधकाम परवानगीतून 151 कोटी 86 लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून त्यामध्ये 84 कोटी 75 लाख 84 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी पुढाकार घेतला आहे. उत्पन्नवाढीची आढावा बैठक त्यांनी घेतली. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे, सहाय्यक आयुक्त प्रवीण आष्टीकर, विजय खोराटे,  मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आयुक्त संदिप खोत, अण्णा बोदडे, सह शहर अभियंता मकरंद निकम, अग्निशामक अधिकारी किरण गावडे, मुख्य उद्यान अधिक्षक  सुरेश साळुंखे, संबंधित विभागाचे प्रशासन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जुनी कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. जुन्या कामांना तरतूद कमी पडू नये आणि नवीन कामांना तरतूद मिळण्यासाठी महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे महापालिकेच्या उत्पान्नामध्ये चांगली वाढ झाल्याचे मडिगेरी यांनी सांगितले.

बांधकाम परवानगी विभागाने सर्वाधिक उत्प्पन मिळविले आहे. मागील वर्षी 67.10 कोटी उत्पन्न मिळविले होते. यावर्षी 151.86 कोटी उत्पन्न मिळविले आहे. गतवर्षीच्या तुलनेत 87.75 कोटी म्हणजेच 126.30 इतक्या टक्यांनी उत्पन्न वाढले असून आज अखेर 196.84 कोटी इतके उत्पन्न मिळाले आहे. करसंकलन विभागातून पहिल्या तिमाहित 228.23 कोटी उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 43.23 कोटी रुपयांनी वाढ झाली असून आजखरे 250.89 कोटी इतके उत्पन्न मिळालेले आहे. त्यामध्ये थेरगावातील विभागीय कार्यालयाने सर्वाधिक 52.28 कोटी उत्पन्न मिळविले आहे.

पाणीपुरवठा, अग्निशामक विभागाच्या ही उत्पन्नात मागील वर्षीच्या तुलनेत 98 व 99 टक्के वाढले आहे. भूमि आणि जिंदगी व आकाशचिन्ह व परवाना विभाग या विभागाने उत्पन्न वाढीच्या दृष्टीने जास्तीत-जास्त प्रयत्न करण्याच्या सूचना सभापती मडिगेरी यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.