Pune Ringroad :पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 250 कोटींचा मोबदला वाटप

एमपीसी न्यूज – पुणे (Pune Ringroad) चक्राकार महामार्गासाठी (रिंगरोड) संमतीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याला जमीन मालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 125 एकराचा ताबा घेण्यात आला असून 250 कोटींचा मोबदला वाटप करण्यात आला आहे.

Chinchwad : संतोषी मा महिला भजनी मंडळाला पहिले पारितोषिक

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासोबत राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. याबाबत जमीन मालकांशीदेखील संवाद साधण्यात येत असून त्यांना विश्वासात घेतले जात आहे.

संमती निवाड्याने जमीन घेताना भूधारकांना 25 टक्के अधिक मोबदला देण्यात आला आहे. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीच्या बैठकीत संमतीचा विकल्प सादर करणे व करारनामा करण्यास 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.

चक्राकार महार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेशी संबंधित 35 गावातील एकूण 16 हजार 940 खातेदारांपैकी 8 हजार 30 खातेदारांनी भूसंपादनासाठी संमती दर्शविली आहे. त्यापैकी 275 खातेदारांना 125 एकर जमिनीच्या मोबदल्यात 250 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले  आहे. मोबदला वाटपाची प्रक्रिया वेगाने होत असल्याने त्याला भूधारकांचेही चांगले सहकार्य मिळत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन प्रक्रीयेचा आज आढावा घेतला. संमतीने निवाडा करण्याच्या विकल्पास भूधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून  जमीन ताब्यात देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची  जुळवाजुळव करण्यास अवधी लागत असल्याने संमतीचा विकल्प सादर करण्यासाठी वाढविण्याची विनंती भूधारकांनी केली होती.

त्यानुसार 21 ऑगस्ट 2023पर्यंत विकल्प सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 21 ऑगस्ट पर्यंत संमतीपत्र आणि करारनामा प्राप्त न झाल्यास उर्वरीत भूधारकांची संमती नाही असे समजून 25 टक्के वाढीव मोबदल्याशिवाय भूसंपादनाचा निवाडा प्राधिकृत भूसंपादन अधिकाऱ्यांकडून घोषीत करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, “भूधारकांनी दिलेल्या मुदतीत संमती विकल्पाद्वारे 25 टक्के अधिक मोबदल्याचा लाभ घ्यावा आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाच्या या प्रकल्पासाठी योगदान देण्याच्या भावनेने प्रशासनाला सहकार्य करावे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.