Pimpri : डोळे येण्याची साथ फोफावली, शहरातील 2723 जणांना प्रादुर्भाव

एमपीसी न्यूज – आळंदीनंतर आता पिंपरी (Pimpri) -चिंचवड शहरामध्ये डोळे येण्याची साथ आली असून त्याचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. 20 जुलैपासून शहरातील 2723 जणांना प्रादुर्भाव झाला आहे. त्यात शाळेतील मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अ‍ॅडिनो व्हायरसमुळे होतो.

Pune Ringroad :पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 250 कोटींचा मोबदला वाटप

वातावरणातील अनिश्चित बदलांमुले आता साथीचे रोग पसरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे डोळे येणे. सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे. लहान मुलांना डोळे येण्याचं प्रमाण अधिक आहे. यंदा डोळ्यांचा संसर्ग सौम्य स्वरुपाचा दिसत असला तरी संसर्ग मात्र मोठ्या प्रमाणात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 20 जुलैपासून 2723 जणांना प्रादुर्भाव झाला आहे. दिवसाला 300 जणांना प्रादुर्भाव होत आहे. यापैकी एकाही जणाला रुग्णालयात दाखल करावे लागले नाही.

महापालिकेच्या सर्व रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. डोळ्यात सोडण्याचे औषध देवून रुग्णाला घरी सोडले जाते. त्यावर रुग्ण बरे होत आहेत. ज्या शाळेत पाचपेक्षा जास्त मुलांना प्रादुर्भाव झाल्यास त्याची माहिती वैद्यकीय विभागाला देण्याबाबत मुख्याध्यापकांना पत्र दिले आहे. शाळेने तपासणीस बोलविल्यास वैद्यकीय टीम शाळेत जावून मुलांची तपासणी करत असल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी सांगितले.

आजाराची लक्षणे

डोळे लाल होणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळे दुखणे, पाणी येणे, ताप आल्यासारखे होणे, प्रकाश सहन न होणे ही लक्षणे आहेत. या साथीचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे होतो. डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, चष्मा वापरु नये असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.

नागरिकांना आवाहन

पावसामुळे माशा किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर तो परिसर स्वच्छ ठेवावा. ज्या व्यक्तीला डोळे आले असतील त्याने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. डोळ्याला वारंवार हात लावू नये, तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे. एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो.

त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवाव्यात, जेणेकरून रोगाचा प्रसार कुटुंबातील इतर सदस्यांना होणार नाही. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. डोळ्याचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी आजाराची लक्षणे आढळल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात, दवाखान्यात,आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.