शनिवार, डिसेंबर 3, 2022

वाकड, थेरगाव, ताथवडे, पुनावळेत मतदारांचा उत्साह; दुपारपर्यंत 33 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 24, 24, 26 मधील थेरगाव, वाकड, पिंपळे निलख, विशाल नगर, ताथवडे, पुनावळे, कस्पटे वस्ती परिसरात दुपारी दोनपर्यंत शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडले. सकाळी दहानंतर मतदारांनी मतदान केंद्राकडे धाव घेतल्याने सर्वच केंद्रावर रांगा दिसत होत्या. काही किरकोळ अपवाद वगळता दुपारपर्यंत सुमारे 33 टक्के मतदान झाले होते.

भूमकर वस्ती येथील आबाजी रामभाऊ भूमकर महापालिका शाळा परिसरात दोन उमेदवारांत किरकोळ बाचाबाची झाल्याने येथे काही काळ तणाव होता. त्यातच बोटावरील शाही घालवित बोगस मतदान करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुमारे 13 मतदारांना लिक्विडसह पकडले तर थेरगावात बाहेरील जिल्ह्यातून आलेले एक वाहन आणि बोगस मतदार पकडल्याची देखील विश्वसनीय माहिती समोर आली. 

सकाळी आठच्या नंतर हळूहळू सर्वच केंद्रावर गर्दी वाढायला सुरुवात झाली. मात्र, सोसायटीतील अनेक मतदारांना आपले मतदान परिसरा बाहेरील बुथवर असल्याचे केंद्रावर गेल्यानंतर स्लिप पाहून समजले. त्यामुळे त्यांच्यात मोठा संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण होते, असे काही मतदार इतर मतदान केंद्राचा पत्ता विचारताना दिसत होते. मात्र, सकाळपासूनच ताथवडेतील नृसिंह शाळा, जिल्हा परिषदेची शाळा, वाकड मनपा शाळा, भूमकर मनपा शाळा, गुड सॅम रिटर्न शाळॆत  मतदारांत उत्साह जाणवला. या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी होती.

"wakad"

Latest news
Related news