Wakad : फिरत्या शौचालयाचे दरवाजे चोरीला

एमपीसी न्यूज – स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत फिरते शौचालय (मोबाईल टॉयलेट) शहरातील काही भागात लावण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांचा नजरेतून ती देखील सुटत नाहीत. थेरगाव मध्ये लावण्यात आलेल्या महापालिकेच्या फिरत्या शौचालयाचे दरवाजे चोरीला गेले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 6) सकाळी उघडकीस आली.

शेखर दत्तात्रय निंबाळकर (वय 41, रा. वर्धमान सोसायटी, रत्नदीप कॉलनी, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगावमध्ये महापालिकेने फिरते शौचालय लावले आहे. ते नागरिकांच्या वापरात आहे. त्या शौचालयाचे दरवाजे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, फिरते शौचालय चोरीला गेल्याची घटना 10 एप्रिल ते 7 मे दरम्यान ताथवडे येथे घडली होती. हिंजवडी पोलिसांनी चोरीला गेलेल्या शौचालयाचा शोध घेतला. पिंपरी न्यायालयाने 4 जुलै रोजी हे शौचालय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने 23 जुलै रोजी फिरते शौचालय ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.