Mumbai : सागर साहनी अपहरण आणि खून प्रकरणातील सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अतिशय गाजलेल्या सागर साहनी अपहरण आणि खून प्रकरणातील सहाही आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. 2012 साली पुणे सत्र न्यायालयाने सहा आरोपींना मोक्का अंतर्गत दोषी मानत शिक्षा सुनावली होती. त्यावर आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आरोपींच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सहा वर्षांनी निकाल दिला.

नितीन मोढा, प्रसाद शेट्टी, अरविंद चौधरी, भिकू थांकी, जितेंद्र मोढा, चोटी घाईसावाला उर्फ रावेतसिंग अशी उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्यांची नावे आहेत.

वरील सहा जणांनी मिळून ऑगस्ट 2005 मध्ये आपल्या कारमधून जात असलेल्या सागर साहनीचे अपहरण केले. त्याला गुजरात येथे लपवून ठेवले. त्याबदल्यात सागरच्या घरच्यांकडे दोन कोटींची मागणी केली. घरच्यांनी 15 लाख रुपयांची रक्कम आरोपींना दिली. त्यानंतर आरोपींनी सागरचा खून करून मृतदेह नाशिक जवळ वापी महामार्गावर टाकून दिला.

पुणे पोलिसांनी हैद्राबाद, गुजरात पोलीस आणि इंटरपोलच्या मदतीने अकरा जणांना ताब्यात घेतले होते. पुणे सत्र न्यायालयाने त्यातील सहा जणांना 2012 साली दोषी मानले होते. त्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सहा वर्षांनी यावर निर्णय दिला असून सहाही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.