Pune : पुण्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक

एमपीसी न्यूज- बीडीपी, मेट्रो, शिवसृष्टी, न्यायालयाचे खंडपीठ यांसह पुण्यातील महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी 11 सप्टेंबर रोजी मंत्रालयात खास बैठक बोलावण्यात आली आहे. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पुण्यातील विकास कामांना गती मिळावी आणि प्रलंबित कामे लवकर मार्गी लागावीत, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी 17 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना बैठक आयोजित करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत ही बैठक 11 सप्टेंबर रोजी मंत्रालयात होणार आहे.

पुण्यातील मेट्रो प्रकल्प व चांदणी चौक येथील उड्डाणपूल हे दोन्ही प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने जमीन संपादित करून बीडीपी बाबत निर्णय घेणे, चांदणी चौक येथील उड्डाणपूल, शहरांमध्ये एकूण 40% झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्या निर्मूलनाच्या कामांमध्ये गती आणणे, मेट्रोसाठी बालेवाडी येथील शासकीय जागा तात्काळ हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेणे, पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करणे, पिंपरी चिंचवड येथे नव्याने सुरू केलेल्या पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कमतरते बाबत आढावा घेणे यांसह विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.