Dighi : प्रेयसीला चिठ्ठी द्यायला नकार दिल्याने प्रियकराकडून अल्पवयीन मुलाला मारहाण

इंद्रायणी तीरावरील प्रकार

एमपीसी न्यूज – प्रेयसीला चिठ्ठी देण्यासाठी तरुणाने एका 13 वर्षाच्या मुलाची मदत घेण्याचे ठरविले. तरुणाने मुलाजवळ चिठ्ठी देऊन ती चिठ्ठी मुलीला देण्यास सांगितले. यासाठी मुलाने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या तरुणाने मुलाला मारहाण केली. तसेच मुलगा त्याच्या मित्रासोबत घरी जात असताना तरुणाने त्यांच्या अंगावर मोटारसायकल घातली. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला. हा सर्व प्रकार रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर घडला.

नवनीतकुमार नानासाहेब देशमुख (वय 35, रा. हरिओम आश्रम, इंद्रायणी नगर, देवाची आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात मोटार सायकल स्वराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख आळंदी येथील हरिओम आश्रमात शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. ते मुलांना योग शिकवितात. रविवारी त्यांच्या आश्रमातील दोन अल्पवयीन मुले सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आळंदी मधील इंद्रायणी नदीच्या काठावर बसले होते. त्यांच्या शेजारी काही अंतरावर 4-5 तरुणी बसल्या होत्या. दरम्यान आरोपी तरुणाला त्या मुलींपैकी एका मुलीला चिठ्ठी द्यायची होती. त्यासाठी त्याने संबंधित अल्पवयीन मुलाची मध्यस्थी म्हणून निवड केली.

आरोपी तरुणाने या मुलाजवळ चिठ्ठी दिली. ही चिठ्ठी त्यांच्या पलीकडे बसलेल्या तरुणींपैकी एका तरुणीला दे असे सांगितले. या कामाला अल्पवयीन मुलाने नकार दिला. यावरून रागावलेल्या तरुणाने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेनंतर ती दोन अल्पवयीन मुले इंद्रायणी घाटावरून आश्रमाकडे पायी चालत परत येत होते. त्यावेळी आरोपी तरुणाने त्याची दुचाकी (एम एच 12 / सी व्ही 3399) संबंधित अल्पवयीन मुलाच्या अंगावर घातली. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन लगेच धूम ठोकली. हा सर्व प्रकार या दोन मुलांनी त्यांचे शिक्षक देशमुख यांना सांगितला असता त्यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.