Hinjawadi Crime News : बालविवाह लावल्या प्रकरणी सासर, माहेरच्यांसह लग्न लावणाऱ्या ब्राह्मणाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असताना तिचा विवाह लावला. विवाहानंतर सासरच्या लोकांनी तिचा हुंड्यासाठी छळ केला. हा प्रकार 20 जून 2019 ते 12 डिसेंबर 2021 या कालावधीत बाणेर पुणे, करमाळा सोलापूर आणि घरकुल चिखली येथे घडला. याप्रकरणी सासर, माहेरच्या लोकांसह लग्न लावून देणा-या ब्राह्मणाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती, सासरे, सासू, वडील, आई, नणंद, नंदावा आणि लग्न लावून देणारा ब्राह्मण यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 498 (अ), 323, 504, 506, 34, बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम 9, 10, 11 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहीत मुलीने सोमवारी (दि. 13) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असताना देखील त्यांचे लग्न जमवून 34 वर्षीय व्यक्तीसोबत लावून दिले. लग्नानंतर आरोपी पती, सासू आणि सासरे यांनी फिर्यादीकडे दुचाकी आणि घरासाठी दोन लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी केली.

हुंड्यासाठी फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला हाताने मारहाण करून वारंवार शिवीगाळ केली. सासरी होत असलेल्या जाचाला कंटाळून फिर्यादी माहेरी राहण्यासाठी आली असता तिच्या आई-वडिलांनी देखील मारहाण करून शिवीगाळ केली. याबाबत फिर्यादीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.