Charholi: ‘चर्‍होलीतील कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न सोडवा; अन्यथा हंडा मोर्चा काढणार’

राष्ट्रवादीच्या नगरसेविका विनया तापकीर यांचा इशारा

एमपीसी न्यूज – चर्‍होली, वडमुखवाडी, लक्ष्मी नारायणनगर कॉलनी या भागांत कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कृत्रिम पाणी टंचाईमुळे परिसरातील नागरिक वैतागले आहे. ही समस्या तातडीने न सोडविल्यास पालिका भवनावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका विनया तापकीर यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका तापकीर यांनी म्हटले आहे की, च-होली परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. पारीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांमुळे ही समस्या निर्माण होत आहे. वेळोवेळी अधिकार्‍यांच्या निदर्शनास ही बाब आणून देखील तो प्रश्‍न कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.

नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठ्यासाठी या भागासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात यावी. बुस्टर पंपाची व्यवस्था करावी. पाण्याच्या वेळेचे योग्य नियोजन करावे. एक दिवसाआड पाणीपुरवठा केला तरी, तो पुरेशा दाबाने आणि पुरेसा प्रमाणात पाणी मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात तातडीने उपाययोजना न केल्यास पालिका भवनावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा तापकीर यांनी निवेदनातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.