Chinchwad : नॉव्हेल स्कूलच्या पाचवीच्या विद्यार्थ्याने लिहिलेल्या ‘माय फर्स्ट मिशन’ पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज- नॉव्हेल स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मृण्मय प्रकाश पवार या 11 वर्षाच्या विद्यार्थ्याने फिक्शन स्टोरीज असलेले ‘माय फर्स्ट मिशन’ पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले.

नॉव्हेल इंटरनशनल स्कूलमध्ये झालेल्या समारंभाला संचालक विलास जेऊरकर, शाळेच्या प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे तसेच शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमा दरम्यान इयत्ता सहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी मृण्मयची मुलाखत घेतली. मृण्मय म्हणाला की, “हा अनुभव माझ्यासाठी फारच सुंदर होता ज्यामुळे माझे लेखन कौशल्य समृद्ध होत आहे. मला बालपणापासूनच कल्पना शक्तीच्या आधारावर काहीतरी वेगळ लिहिण्याची आवड निर्माण होत गेली यामध्ये माझ्या आई-बाबांनी मला खूपच प्रोत्साहन दिले; आणि हे ‘माय फर्स्ट मिशन’ असलेले पुस्तक लिहिण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली. आणि माझ्या आई बाबांच्या सहकार्याने ती पूर्णत्वास गेली.

हे पुस्तक लिहिण्यासाठी मला एक महिन्याचा कालावधी लागला. दररोज शाळेचा गृहपाठ पूर्ण झाल्यानंतर, तर कधी कधी शाळेमधेच मोकळ्या तासामध्ये मी कल्पनाशक्तीच्या आधारावर गोष्टी लिहून बघायचो. तुमच्या डोक्यात एखाद्या कुठल्या चरित्र विषयी कल्पना शक्तीच्या आधारावर काही तयार होत असेल तर ते तुम्ही कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करावा, आणि यातूनच तुमची लेखनाची आवड वृद्धिंगत होत जाते” असे तो म्हणाला.

“मला ऐतिहासिक पुस्तके फार आवडतात. माझा आवडता लेखक Genorimo Stilton हा आहे. तसे मला भारतातले बरेचसे लेखक पण आवडतात. पुढे मोठा होऊन मला भरपूर पुस्तके लिहायची आहेत” प्रसिद्ध लेखक होण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

यावेळी अमित गोरखे म्हणाले की, मृण्मयमध्ये नोव्हेल इंटरनशनल स्कूलचे उद्याचे भविष्य दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना त्यांच्या पालकांनी व शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावे. अशा गुणांना नोव्हेल स्कूल त्यांना एक समृद्ध व्यासपीठ उपलब्ध करून देईल. मुलांनी भरपूर पुस्तक वाचन करावे, छोट्या छोट्या कथा लिहाव्यात, विज्ञानावर आधारित प्रकल्प बनवावेत, वेगवेगळ्या रांगोळी काढून बघाव्यात, दिवाळीत किल्ले बनवावेत अशातूनच मुलांच्या अंगी असलेले कलागुण दिसून येतात” यावेळी त्यांनी उदयोन्मुख लेखक मृण्मयला आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. मृण्मयचे हे पुस्तक नोशनप्रेस या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.