Pimpri: पाणी कपातीचे संकेत; पदाधिकारी, अधिका-यांची बैठक

एमपीसी न्यूज – पवना धरणातून दिवसाला 480 एमएलडीऐवजी 440 एमएलडीच पाणी उचलण्याचे सक्त आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. आजमितीला धरणात 79.93 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा 30 जून 2019 पर्यंत पुरु शकेल. तथापि, पावसाने ओढ दिल्यास पुढे काय करायचे? असा प्रश्न आहे. त्यावर मात करण्यासाठी आठवड्यातून विभागानीहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. सध्या पाणी कपातीची आवश्यकता नसून पुढील काही दिवसात टप्या-टप्याने पाणी कपात करावीच लागणार असल्याचे सांगत आयुक्तांनी आगामी काळात पाणीकपातीचे संकेत दिले आहेत.

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला गतवर्षीपेक्षा 10 टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये. त्यासाठी सध्याची पाणीपुरवठ्याची परिस्थिती आणि पाणीपुरवठा कपात करण्याबाबत आज (बुधवारी)पदाधिकारी आणि अधिका-यांची बैठक झाली. त्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. आयुक्त दालनात महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे कैलास बारणे, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे, विशाल कांबळे उपस्थित होते.

सध्या पाणी कपातीची आवश्यकता नाही. पाणी गळती रोखण्यावर भर दिला जाणार आहे. बैठकीत पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि कपातीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगत आयुक्त  आयुक्त हर्डीकर म्हणाले, महापालिकेने पाण्याचे नियोजन करावे. दिवसाला 440 एलएलडीच पाणी धरणातून उचलावे, असे निर्देश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. 440 एमएलडी पाणी उचलल्यास जुलै 2019 पर्यंत पाणी पुरु शकते. परंतु, पावसाने ओढ दिल्यास अडचण होईल. त्यामुळे पाणी कपात करणे आवश्यक आहे. अनधिकृत नळजोड मोहिम हाती घेतली आहे. अनधिकृत नळजोड, पाणीगळती रोखण्यावर भर दिला जाणार आहे.

पाणी उचलण्यापासूनच दहा टक्के कपात करावी लागणार असल्याचे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, गतवर्षी एक दिवसाआड पाणीपुरवठा केला होता. एकदिवसाआड पाणीपुरवठा केल्यामुळे अडचणी निर्माण होतात. ताण येतो.पाईप कोरडे राहतात. परिणामी, पाणीपुरवठा विस्कळीत होतो. आजच्या चर्चेत पाणी कपातीबाबत दोन पर्याय पुढे आले आहेत.

आठवड्यातून विभागानीहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद करणे. त्यामुळे ज्या भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्या भागाला जादा दाबाने पाणीपुरवठा होईल. याशिवाय आठवड्यातून एक दिवस धरणातून पाणीच उचलायचे नाही. एक दिवस पाणी उचलण्याचे खंडीत करायचे. त्यामुळे दहा टक्के पाणीकपात होईल. या दोन्ही पर्यायाचा कृती आराखडा करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. धरणातून दिवसाला 440 एमएलडी पाणी उचलूनच याचा आराखडा तयार केला जाईल, असेही आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले,’पवना धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 10 टक्क्यांनी कमी झाला आहे.गतवर्षी आजमितीला धरणात 90 टक्के पाणीसाठा होता. तर, यंदा 79.93 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असले तर पाणीकपात करणे आवश्यक आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. पावसाने ओढ दिल्यास पाण्याचा प्रश्न गंभीर होवू शकतो. त्यासाठी पाणीपुरवठ्याचे आठ दिवसात नियोजन करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या आहे. त्यानंतर बैठक घेऊन पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.