PCMC : पाण्याच्या तक्रारी वाढताच 19 मोटार पंपांवर महापालिकेची कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पाणी जपून वापरावे असे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील पारा चाळीशी पार झाला असल्याने पाण्याची मागणी सातत्याने वाढू लागली आहे. अशातच आंद्रा धरणातून येणारे पाणी कमी झाल्याने समाविष्ट गावासह उपनगरांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर (PCMC) महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नळाला थेट मोटार लावून पाणी घेणाऱ्या नागरिकांच्या 19 मोटार पंप जप्त करून धडक कारवाई केली आहे.

उन्हाळा सुरू होताच शहरातील विविध भागातून अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे (PCMC) महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जुनी सांगवीमध्ये इलेक्ट्रिक मोटार लावून पाणी घेणाऱ्या 19 मोटार पंप जप्त केले आहेत.  जुनी सांगवी येथील मधुबन सोसायटीमधील 1 ते 10 लेनमध्ये असणाऱ्या अनधिकृत मोटार पंपावरती महापालिकेच्या ‘ह ‘क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पाणीपुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली.

याप्रसंगी महापालिकेचे उपअभियंता चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता साकेत पावरा, सागर पाटील, संदीप खेपले, सहायक अभियंता श्वेता डोंगरे, सांगवी पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर, मजूर वॉल्व्ह ऑपरेटर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पर्यवेक्षक किरण गुजले, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Entelki Jeevan Disha : ‘जीवन दिशा’ परिपूर्ण करिअर व्यवस्थापन चाचणीबद्दल आज रात्री आठ वाजता ऑनलाईन चर्चासत्र

महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना पाणीपुरवठा अधिकृतरित्या नळजोड देऊन केला जात असतो. महापालिकेच्या प्रभाग 32 मध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली होती. योग्य दाबाने पाणीपुरवठा होत असतानाही अनेकदा कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला येत होत्या. अखेर त्याची शहानिशा करून 19 मोटर पंपावर कारवाई करण्यात आली आहे.

मोटारी जप्त करण्याची कारवाई सुरूच ठेवणार

सांगवी परिसरातील नागरिक दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे इलेक्ट्रिक विद्युत पंप लावून मोठ्या प्रमाणात पाणी उपसतात व त्यामुळे परिसरातील इतर नागरिकांच्या तक्रारी  प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. यावर आळा बसविण्यासाठी तसेच तक्रारीचे निरसन करण्यासाठी सांगवी परिसरात मोटार पंप जप्त करण्याची  कारवाई करण्यात आली. अशाच प्रकारे शहरातील इतर भागातही मोटार पंप लावून पाणी घेणाऱ्या नागरिकांच्या मोटारी जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिला आहे.

वॉशिंग सेंटर चालकांवर कारवाईचे काय?

पिंपरी-चिंचवड शहरात वॉशिंग सेंटरची संख्या मोठी आहे. यामधील अनेक वॉशिंग सेंटर चालक बोअरवेलचे पाणी, काही चालक व्यावसायिक नळजोड घेऊन मोटारी धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरत आहे. मात्र, काही वॉशिंग सेंटर चालक अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन पिण्याचे पाणी वापरत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे अशा वॉशिंग सेंटर चालकांचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सर्वेक्षण करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.