Pimpri : महापालिकेला मोठा आर्थिक ‘ भुर्दंड ’ सोसावा लागणार – नगरसेवक तुषार कामठे

अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत

एमपीसी न्यूज -पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध विकास कामांसाठी ठेकेदाराकडून जादा दराने निविदा भरल्या जात आहेत. यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत होत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केला आहे. स्थापत्य विभागामार्फत डांगे चौक व काळेवाडी फाटा येथे ग्रेडसेपरेटर बांधण्याच्या कामासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली आहे. परंतु, या कामासाठी संबधित ठेकेदाराने निविदा दरापेक्षा मोठ्या प्रमाणात ज्यादा दराने निविदा भरल्या आहेत. ज्यादा दराने आलेल्या या निविदांमुळे कोट्यावधी रुपयांचा अर्थिक ‘भुर्दंड’ महापालिकेला सोसावा लागणार आहे. तरी अशा प्रकारच्या जादा दराच्या निविदा रद्द करून त्या कामांच्या फेरनिविदा काढाव्यात अशी मागणी कामठे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

नगरसेवक तुषार कामठे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरामध्ये ठिकठिकाणी प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर आणि इतर कामे केली जात आहेत. या कामांचे निविदा दर महापालिकेच्या संबधित विभागातील अधिकाऱ्यांमार्फत निश्चित केले जातात. त्याआधारे निविदा प्रक्रिया राबवून कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविणाऱ्या निविदाधारकाकडून काम करून घेतले जाते. परंतु, महापालिकेत मागील काही महिन्यांपासून अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमताने ज्यादा दराच्या निविदा भरल्या जात आहेत. या प्रकारांमुळे महापालिकेचे तसेच पर्यायाने शहरातील करदात्या नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब नुकतीच स्थापत्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवरून निदर्शनास आली आहे. स्थापत्य विभागामार्फत डांगे चौक आणि काळेवाडी फाटा येथे ग्रेडसेपरेटर बांधण्याच्या कामासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली आहे. परंतु, या कामासाठी संबधित ठेकेदाराने निविदा दरापेक्षा मोठ्या प्रमाणात ज्यादा दराने निविदा भरल्या आहेत. ज्यादा दराने आलेल्या निविदांमुळे कोट्यावधी रुपयांचा अर्थिक ‘भुर्दंड’ महापालिकेला सोसावा लागणार आहे. ज्यादा दराने आल्याने अशा कामांमध्ये संबधित अधिकारी व ठेकेदार संगनमताने निविदाप्रक्रिया राबवित असल्याचा संशय येतो. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी तातडीने या दोन्ही कामाच्या निविदा रद्द कराव्यात. या कामांची फेरनिविदा करून नव्याने निविदाप्रक्रिया राबवावी. त्या बरोबर ही निविदाप्रक्रिया राबविणाऱ्या संबधित स्थापत्य विभागातील सर्व अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.