Chikhali : चिखलीत भंगारच्या गोदामाला भीषण आग ; शेकोटीच्या ठिणगीने पेटली गोदामे ?

एमपीसी न्यूज – भंगारच्या गोदामाला आग लागली. या आगीत मोठ्या प्लास्टिकच्या गोदामासह अन्य काही दुकाने जळून खाक झाली. ही आग शेकोटीची ठिणगी पडल्याने लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही घटना रविवारी (दि. 31) रात्री पावणेनऊच्या सुमारास वडाचा मळा, चिखली येथे घडली. मात्र याबाबत अग्निशामक दलाने अधिकृत दुजोरा दिला नाही.

अग्निशमन विभागाला रात्री पावणे नऊच्या सुमारास वडाचा मळा येथे एका भंगारच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार काही क्षणात चिखली अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आग मोठ्या प्रमाणात लागली असल्याने अन्य अग्निशमन विभागाचे बंब बोलावण्यात आले. एकूण सात बंब आणि खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्यात आली. रात्री साडेअकराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र कुलिंगचे काम आज, सोमवारी (दि. 31) सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होते.

या आगीत 50 पेक्षा अधिक गोदामे जळल्याची शक्यता आहे. याला अग्निशमन विभागाकडून दुजोरा देण्यात आला नाही. आग लागलेल्या गोदामाजवळून मोठी इलेक्ट्रिक वायर जात नाही तसेच शॉर्ट सर्किट होण्याचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता नाही. मात्र थंडी असल्याने काहीजणांनी गोदामाजवळ रात्री शेकोटी केली होती. हवेमुळे त्या शेकोटीची ठिणगी गोदामाकडे जाऊन आग लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र याबाबत अग्निशामक दलाने अधिकृत दुजोरा दिला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.