Talegaon Dabhade : हरियाणाचा विशाल ठरला हिंद केसरी; सेनादलाच्या राजन तोमरला दाखवले आस्मान

एमपीसी न्यूज- सोमाटणे येथे गेल्या तीन दिवसा पासुन होत असलेल्या राष्ट्रीय पारंपरिक कुस्ती स्पर्धेत हरियाणाच्या विशालने सेनादलाच्या राजन तोमरला अवघ्या काही मिनिटात हप्ता डावावर चितपट करत आस्मान दाखवले.

अवघ्या 19 वर्षांचा विशाल चपळाईने खेळ करण्यात माहीर होता. हे सर्वाना माहीत होते परंतु आज पुणेकरांना प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला. हरियाणाचा विशाल, सेनादलाचा राजन तोमर, चंदीगडचा जास्वर सिंग, राजस्थानचा अनिल कुमार यांच्यात लढती होऊन फायनल साठी हरियांणाचा विशाल आणि सेनादलाचा राजन तोमर यांची निवड झाली. गेले तीन दिवस सोमाटणे येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय पारंपरिक हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा रविवारी अंतिम दिवस असल्याने या मैदानात सुमारे दहा ते बारा हजार कुस्ती शौकीन उपस्थित होते .

विशाल आणि राजन या दोघांमध्ये तीन मिनिटे चाललेल्या कुस्तीत विशाल विजयी ठरला. अंगकाठीने किरकोळ दिसणारा विशाल खेळात मात्र तरबेज ठरला खेळ सुरु असताना सबंध मैदानातील प्रेक्षक डोळ्यात प्राण आणून कुस्ती पाहत होते कोणी अंदाज बांधत होते तर कोणी प्रोत्साहन देत होते. पाहता पाहता एकच जल्लोष झाला . राजनने टाकलेल्या फणी डावाला परतवत विशालने हप्ता डाव टाकला आणि डोळ्यांचे पाते लावते न लावते तोच सर्वांचा एकच गलका झाला आणि हरियाणाचा विशालने हिंद केसरीच्या किताबावर आपले नाव कोरले. विशालला चांदीची गदा केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आली .

यावेळी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग, माजी मंत्री मदन बाफना, भारतीय कुस्ती संघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, बापूसाहेब भेगडे, माउली दाभाडे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, विकास काढुरे, रुस्तुम – ए- हिंद अमोल बुचडे, हिंद केसरी अमोल बराटे, किरण भगत, भारत केसरी विजय गावडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, अशोक घारे, संतोष भेगडे, संतोष मुऱ्हे, सुनील भोंगाडे, कैलास गायकवाड, किशोर सातकर, गणेश बोत्रे, अविनाश गराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.