Pimplegurav : इंटरनेटरुपी व्यसनापासून मुक्ततेसाठी पन्हाळा ते विशाळगड पदभ्रमण शिबिर

एमपीसी न्यूज- सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात पालकांचे आपल्या पाल्यांच्या भविष्याकडे होत असलेले दुर्लक्ष, अगदी लहान वयामध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता, सोशल मीडियाचे वाढते आकर्षण या नवीन व्यसनांपासून तरुणाईला मुक्त करण्याच्या उद्देशाने गेल्या बारा वर्षापासून शिव विचार जागर अभियान, शिवशाही संघटना व मराठवाडा जनविकास संघ यांच्या संयुक्तपणे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांवर तरूण व बालकांसाठी निवासी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यंदा पन्हाळगड ते विशाळगड असे तीन दिवसीय ‘शिवसंकल्प युवक पदभ्रमण शिबिर राबविण्यात आले. त्याला युवक व बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचा प्रारंभ मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरूण पवार यांच्या हस्ते सांगवी येथील श्री गजानन महाराज मंदिरापासून 28 डिसेंबर रोजी करण्यात आला. 29 डिसेंबरच्या पहाटे पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वीर शिवाजी काशिद यांच्या समाधीला मानवंदना देण्यात आली. वीर शिवाजी काशिद व वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून 125 शिबिरार्थींच्या जय घोषाने पन्हाळगडाचा परिसर दणाणून गेला. शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटण्यासाठी निवडलेल्या मार्गाने म्हणजेच म्हसई पठार, खोतवाडी, धनगरवाडी मार्गे करपेवाडी येथे शिबिरार्थी पहिल्या मुक्कामी पोहचले. रात्रीच्या शेकोटी संमेलनाच्या सत्रामध्ये दुर्गमभाग शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राहुल शिंदे यांनी ‘शिवकालीन नागरिकांची शिवनिष्ठा’ विषयावर संवाद साधत त्या शिवकालीन रात्रीचा थरार जिवंत केला. शिवव्याख्याते ॠषीकेश शेलार यांच्या आवाजातील गारदेने या सत्राचा समारोप झाला.

दुसर्‍या दिवसाचा प्रारंभ सामूहिक सूर्यनमस्काराने झाला. सकाळचा शिवपरीपाठ म्हणत सर्व शिबिरार्थींनी करपेवाडीतून आंबेवाडी, कळकेवाडी, रिंगेवाडी, माळवाडी असा प्रवास करत शिबिरार्थी रात्री पांढरपाणी येथे पोहचले. रात्रीच्या सत्रात शिवयोध्दा मर्दानी आखाड्याचे संस्थापक प्रतीक वर्‍हाडी यांनी शिवकालीन शस्त्रास्त्रांची माहिती देत त्याची प्रात्यक्षिकेही दाखवली. मुकेश चव्हाण यांनी शिवकल्याण मंत्राने द्वितीय दिवसाच्या सत्राचा समारोप केला.

तृत्तिय दिवसाची सुरूवात पावनखिंडीतील वीरांच्या शहिद स्तंभाला मानवंदना देत करण्यात आली. शिवशाही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमित थोपटे यांनी ‘घोडखिंड ते पावनखिंड’ हा रोमांचकारी इतिहास शिबिरार्थींच्या डोळ्यासमोर उभा केला. पावनखिंडीतील वीर बाजीप्रभू व बांदल सैनिकांच्या रक्ताने पावन झालेली माती सोबत घेत सर्वांनी विशाळगडाकडे प्रस्थान केले. विशाळगडावर पोहचल्या नंतर सर्वांनी वीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांच्या समाधीला साक्ष मानत प्रत्येकाला रायगडावरील शिवरायांच्या समाधीजवळील पवित्र माती देऊन निर्व्यसनी जीवनाची शपथ घेतली. शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी पन्हाळा- पावनखिंड प्रसंगातील कुशल शिवनितीचे धागेदोरे उलगडून दाखवले. शिबीरार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले व राष्ट्रगीताने शिबिराचा समारोप करण्यात आली.

या शिबिराविषयी मुख्य संयोजक डॉ. गजानन वाव्हळ म्हणाले, ” वर्तमान तरूणाईचा देवादिकांपेक्षा शिवरायांवर अधिक विश्वास आहे. प्रत्येक जाती धर्मातील तरुणाईला शिवरायांच्या सर्वसमावेशक पराक्रमी स्वच्छ व निष्कलंक आयुष्याचे प्रचंड आकर्षण आहे. तरूणाईला शिवराय व्हायचे आहे, पण व्हावे कसे, याचा मार्ग माहित नाही. तो शिवराय होण्याचा प्रचंड कष्टप्रद मार्ग कळावा म्हणून या शिवसंकल्प युवक पदभ्रमण शिबीरांचे आयोजन करण्यात येते.

शिबिराच्या यशस्वीसाठी नृसिंह कनिष्ठ महाविद्यालयाचा आजी माजी विद्यार्थी संघ, नवनाथ जगताप, अरूण पवार, अमित थोपटे, प्रतिक वर्‍हाडी, राहुल शिंदे, सुमीत कुंभार, ऋषीकेश शेलार, मुकेश चव्हाण, विश्वजीत पाटील, माधव मोरे, गणेश दसवडकर, भूषण लोखंडे, प्रमोद मिठभाकरे, रवींद्र सोनार, स्वनील देशपांडे, किशोर घोडके, सुनील कोटकर, विश्वास घोळवे, प्राचार्य रामदास रामावत, मनोज गायके, संदिप तांबे, दत्ता जोगदंड, पवन खडके आदींनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.