Bhosari: रुग्णालयाच्या खासगीकरणास विविध सामाजिक संघटनांचाही विरोध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेले भोसरी रुग्णालय खासगी संस्थेला चालवण्यास देण्यास राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. आवश्यकता असल्यास महाराष्ट्र शासनाची मदत घ्यावी. गोरगरीब नागरिकांना माफक दरात आरोग्य सुविधा मिळण्यासाठी हे रुग्णालय महापालिकेने चालविणे आवश्यक आहे, अशी मागणी विविध संस्था व संघटनांकडून होऊ लागली आहे.

नागरी हक्क सुरक्षा समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिका सभेत कोणतीही चर्चा न करता रुग्णालय खासगीकरणास मंजुरी दिली आहे. आजपर्यंतच्या अनुभवानुसार खासगी संस्था या नफा कमविण्यासाठी मोफत सेवा बंद करतात. शुल्क भरणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. आरोग्य सेवेमध्ये डायलेसिस, सर्जरी, पोस्ट केअर आदी सेवांवर पालिकेस लक्ष ठेवणे शक्‍य नाही. सदर रुग्णालयात पालिकेचे डॉक्‍टर व कर्मचारी जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आर्थिक गैरप्रकार वाढण्याची शक्‍यता आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. पालिकेने सर्वसामान्य नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा मोफत किंवा माफक दरात पुरवावी. रुग्णालयासाठी होणा-या खर्चाकडे पालिकेने लक्ष न देता नागरिकांना मूलभूत सेवा पुरवाव्यात, अशी मागणी केली आहे.

महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, डॉक्टर व भाजपा नेते यांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असून, यामध्ये पिंपरी-चिंचवडकरांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. यामधून जनतेच्या पैशाची लूट होणार आहे. दरम्यान, महापालिकेत पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, सल्लागार, ठेकेदार, यांचा संगनमताने चालणारा भ्रष्टाचार व गैरव्यवहार काही अंशी थांबवला अथवा कमी केला, तर कोणाचीही मदत न घेता भोसरी, वायसीएम रुग्णालयासह महापालिका स्वत:च्या ताकदीवर सर्व रुग्णालय चालवू शकते. आज महापालिका, महाराष्ट्र व देशात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे निधी कमी पडत असेल, तर महाराष्ट्र शासनाची मदत घ्यावी, अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.

भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात कामगार व कष्टक-यांची संख्या अधिक आहे. त्यांना खासगी रुग्णालयातील महागडे वैद्यकीय उपचार परवडणारे नाहीत. नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविणे, हे पालिकेचे कर्तव्य आहे. पालिकेने नागरिकांच्या कररूपी पैशांतून उभारलेले रुग्णालय खासगी संस्थेला चालविण्यास देण्याची बाब निंदनीय आहे. पालिकेने वारेमाप खर्च करून रुग्णालय बांधले. मात्र, राजकीय दबावामुळे ते खासगी संस्थेला चालविण्यास दिले जात आहे. असे न करता पालिकेने स्वत: रुग्णालय चालवून सर्वसामान्य नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार द्यावेत. अन्यथा, आंदोलन केले जाईल. असा इशारा तायडे यांनी दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.