Chakan : फोफावती बालगुन्हेगारी थोपविण्याचे दिव्य … गुन्हा -अटक- सुटकेच्या दुष्टचक्रात बालगुन्हेगार

(अविनाश दुधवडे)

एमपीसी न्यूज- मागील काही काळात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या, लूटमार, मारामाऱ्या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकत असलेले बहुतांश आरोपी तरुण युवक आणि पंधरा ते सतरा वयोगटातील अल्पवयीन असल्याचे दिसून येत आहे. ऐन तारुण्यात गुन्ह्यात अडकल्याने अनेकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होत आहे. ज्या वयात कॉलेजच्या दिशेने पाऊल पडायला हवे होते त्या वयात तुरुंगाच्या वाटेवर पाऊले पडत आहेत. चाकणमध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात गुन्हा -अटक- सुटका आणि पुन्हा गुन्हा अशा दुष्टचक्रात अडकलेल्या बाल गुन्हेगारांची संख्या धक्कादायकरित्या वाढली आहे.

दोन दिवसांपूर्वी खराबवाडी येथील एकाचा खून, आणि एकावर प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींमधील तिघे अल्पवयीन आहे. तर अन्य हल्लेखोरही 18 ते 20 वयोगटातील आहेत. खराबवाडीतील खून आणि खुनी हल्ला झालेल्या युवकांचीही वेगवेगळ्या गुन्ह्यांतून नुकतीच येरवडा कारागृहातून सुटका झाली होती.

मागील वर्षी ( 2018) चाकण येथील शिवाजी विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थाचा खून आणि त्याच्या सतरा वर्षीय मित्रावर झालेला प्राणघातक हल्ल्यामागे सोशल माध्यमावर ठेवलेले आक्षेपार्ह ‘स्टेट्स’ होते. शाळकरी विद्यार्थ्याच्या खून प्रकरणातही सर्व आरोपी अठरा ते पंचवीस वयोगटातील होते. मौजमजेसाठी जबरी चोरी व दुचाकी, मोबाईल चोरणारे तिघे स्थानिक युवक चाकण पोलिसांनी दोन महिन्यापूर्वी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून सात वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले होते. केवळ मौजमजा करण्यासाठी हे तरूण अशा प्रकारचे धाडस करून गैरमार्गाने पैसे मिळवीत असल्याची बाब समोर आली. रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यांचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी नव्याने निर्माण होत असलेल्या अल्पवयीन आणि 18 ते 20 वयोगटातील तरुणांच्या गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणण्याचे दिव्य पोलीस प्रशासनाच्या समोर आहे.

गुन्हेगारीच्या क्रौर्य इतिहासावर नजर टाकल्यास चाकणची बाल गुन्हेगारी मागील काळात वाढत गेल्याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वी प्रशांत बिरदवडे ( वय 19) , मागील वर्षी अनिकेत शिंदे (वय 16) याचा खून , त्या आधी मुटकेवाडीतील रोहन भूरूक याचा खून, महाळुंगेतील संतोष वाळके, त्यानंतरचा हर्षल बोऱ्हाडे खून त्याचप्रमाणे अन्यत्र युवकांकडून झालेल्या खून आणि खुनाचा प्रयत्नाच्या घटना, अल्पवयीन युवकांकडून लुटमारीच्या घटना, एकमेकांचा सूड उगवण्यासाठी घातक शस्त्रांसह पकडलेल्या युवकांच्या टोळ्या, प्रचंड वाढलेले पिस्तुल कल्चर हे सगळे प्रकार धक्कादायक मानले जात आहेत.

16 ते 16 वयोगटातील युवक आणि अल्पवयीन गुन्हेगारीकडे आकृष्ट होण्यासाठी दबदबा, सूड घेणे, क्षणिक राग, कुख्यात होणे, हलाखीची परिस्थिती आणि स्वतःचे किंवा आपल्या युवकांच्या गटाचे वर्चस्व निर्माण करण्याच्या इर्षेतून खून, खुनाचा प्रयत्न, दोन गटांमधील संघर्ष असे अनेक प्रकार घडू लागले आहेत. काही अल्पवयीन गुन्हेगारांना कायद्याची मर्यादा माहिती असल्यामुळे अशा बाल गुन्ह्यांचे प्रमाण चाकण परिसरात वाढत असल्याचेही दिसून येते. यातील काही युवक आणि अल्पवयीन अनवधानाने गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढले जाऊन गंभीर गुन्हे घडत आहेत. काही युवकांना गुन्हेगारीचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले असून त्यातून गंभीर गुन्हे करून गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा निर्माण करण्याकडे त्यांची सुरु असलेली वाटचाल ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

हाफ चड्डीतून फुल पँन्ट मध्ये आलेल्या अल्पवयीन युवकांच्या टोळ्या अत्यंत गंभीर गुन्हेगारीकडे जात असताना त्यांना वेळीच पायबंद घालण्याचे दिव्य पोलीस प्रशासनासमोर आहे. धक्कादायक म्हणजे यातील गुन्हेगारी प्रवृतीच्या युवकांना अवैध धंदे चालकांचे अर्थपूर्ण पाठबळ मिळत असून काही गुन्हेगारांना चक्क छुपा राजाश्रय मिळत असल्याचा गंभीर आरोप होऊ लागला आहे.

प्रत्येक टोळीवर लक्ष देणार : स्मार्तना पाटील ( पोलीस उपायुक्त )

चाकणमधील अल्पवयीन आणि तरुणांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या प्रत्येक टोळीची माहिती घेतली जात आहे. या प्रत्येक टोळीच्या कारवायांवर लक्ष देण्यासाठी स्वतंत्र पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. प्रत्येक टोळी संबंधित अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दत्तक दिली जाणार आहे. त्या टोळीच्या हालचालींवर तेच अधिकारी लक्ष देणार आहेत. चाकण पोलिसांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.