Chakan : खून करून दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आखली होती मोठी व्यूहरचना

एमपीसी न्यूज – भावाच्या खुनाचे सोशल मीडियावर (Chakan) स्टेटस ठेवल्याच्या रागातून तरुणाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून 18 वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केला. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावली. तरुणाचा खून लपविण्यासाठी त्याचे दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत आरोपींचे हे पितळ उघड केले आहे.

गोळीबाराची घटना

18 मार्च रोजी खेड तालुक्यातील रासे फाटा येथे मराठा हॉटेल मध्ये हॉटेल मालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे याच्यावर हॉटेल मध्ये घुसून काही जणांनी गोळीबार केला. त्यात स्वप्नील शिंदे जखमी झाला.

या प्रकरणी राहुल पवार (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड), अजय गायकवाड आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी सुरुवातीला अजय गायकवाड याला अटक केली.

त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अनोळखी आरोपीची ओळख पटवून अमर नामदेव शिंदे (वय 25, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) याला 23 मार्च रोजी अटक करण्यात आली. त्या गुन्ह्यात मुख्य आरोपी राहुल पवार हा अद्याप फरार आहे.

संशयावरून केला गोळीबार

आरोपी राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा मागील तीन महिन्यांपूर्वी खून झाला आहे. त्या गुन्ह्यात स्वप्नील शिंदे याचा सहभाग असल्याचा संशय राहुल पवार याला होता. त्यामुळे त्याने अभिजित सदानंद मराठे (रा. कोथरूड, पुणे) आणि इतर साथीदारांसोबत मिळून स्वप्नील शिंदे याच्यावर गोळीबार केला असल्याचे अमर शिंदे याने पोलिसांना सांगितले.

दोन दिवसांपूर्वीच केला होता एक खून

राहुल पवार याने साथीदारांसोबत मिळून 18 मार्च रोजी स्वप्नील शिंदे याच्यावर गोळीबार केला. मात्र त्यापूर्वी दोन दिवस अगोदर म्हणजेच 16 मार्च रोजी आरोपींनी आदित्य युवराज भांगरे (वय 18, रा. भांगरे वस्ती, महाळुंगे, ता. खेड) याचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा खून झाल्यानंतर त्याचे खुनाचे छिन्नविच्छिन्न फोटो आदित्य भांगरे याने (Chakan) सोशल मिडीयावर स्टेट्सला ठेवले होते. त्याचा राग राहुल पवार याच्या डोक्यात होता. त्यावरून राहुल पवार याने दोन साथीदारांसोबत मिळून 16 मार्च रोजी आदित्य भांगरे याचे कार मधून अपहरण केले. त्याला मारहाण करून वायरने गळा आवळून त्याचा कारमध्येच खून केला होता.

LokSabha Elections 2024 :  स्वीपद्वारे मतदान वाढीसाठी प्रयत्न करावेत; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निर्देश

दृश्यम स्टाईलने पोलिसांची दिशाभूल

आदित्य भांगरे याचा खून करून त्याचे पुरावे आरोपींनी नष्ट केले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी खेड तालुक्यातील निमगाव येथे एका निर्जन स्थळी काहीतरी जाळले. तिथे आदित्य भांगरे याचा मृतदेह जाळला असल्याचा बनाव आरोपींनी केला. तसेच आदित्यचा मोबाईल फोन गोवा येथे एका आरोपीसोबत पाठवला. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणात आदित्य गोवा येथे असल्याचे दिसत होते. दोन्ही ठिकाणी आदित्यचा (Chakan) मृतदेह अथवा त्याबाबत कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. मृतदेह सापडला नाही तर त्याचा आरोपींना न्यायालयात फायदा होईल, असा विचार आरोपींनी केला होता. मात्र पोलिसांनी त्यापुढे जाऊन आरोपींनी आदित्याचे जिथून अपहरण केले तिथले सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपी ज्या मार्गाने गेले त्याचा माग काढला.

डीएनए तपासणीतून मृतदेहाची ओळख पटवणार

आरोपींनी आदित्य भांगरे याला गाडीतच ठार मारून त्याचा मृतदेह महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या वेलवाडा गुजरात येथे एका जंगल परिसरात जाळले होते. आदित्यच्या बेपत्ता झाल्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल होती. पोलिसांनी वेलवाडा येथून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह ओळख पटविण्याच्या अवस्थेत नसल्याने त्याची डीएनए तपासणी करून ओळख पटवली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (परिमंडळ तीन) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त (चाकण विभाग) राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, महाळुंगे एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, संतोष जायभाय, सहायक फौजदार सुरेश हिंगे, पोलीस अंमलदार भैरोबा यादव, संदीप सोनवणे, राजू जाधव, हनुमंत कांबळे, निखील शेटे, नितीन गुंजाळ, सुनील भागवत, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, प्रदीप राळे, निखील वर्पे, महेश कोळी, माधुरी कचाटे, राजेंद्र कोणकीरी, अमोल बोराटे, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, अजय गायकवाड, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, शरद खैरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.