BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : आयटी अभियंत्यांनी फुलविला सेंद्रिय शेतीशिवार

(लीना माने)

एमपीसी न्यूज -वाढत्या प्रदूषणाचा सामना करीत असताना सेंद्रीय शेतीचा आग्रह धरीत वाकडमधील पलाश सोसायटीमधील रहिवाशांनी आपल्या गार्डनच्या जागेत शेतीशिवार फुलविला आहे. विशेष म्हणजे यामध्ये राबणारे बहुतेकजण आयटी क्षेत्रातील आहेत.

पलाश सोसायटीमधील सारिका महाले-श्रीखंडे यांनी ‘लॅण्डमार्क फोरम’च्या विविध सामाजिक संकल्पनांतर्गत हा अनोखा उपक्रम साकारला. सेंद्रीय शेतीचा अनुभव स्वत:सह सोसायटीमधील कुटुंबांनी घ्यावा असा प्रयत्न यातून करण्यात आला. शेती म्हणजे नवनिर्मिती आणि ही नवनिर्मिती कशी होते, याची नव्या पिढीला माहिती व्हावी, या निर्मितीचा त्यांना आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने असा प्रयोग करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम लहान मुलांना सहभागी करून घेण्यात आले.

चिमुकल्यांमध्ये रुची निर्माण झाल्याने आपोआप त्यांचे कुटुंबीयही आनंदाने आले. सोसायटी परिसरातील या शेतीशिवारात राबणाऱ्या हातांमध्ये कोणीही शेतकरी किंवा शेतीची पार्श्वभूमी असलेले नाहीत. यातील बहुतांश जण पुणे परिसरातील आयटी पार्कमध्ये कार्यरत इंजिनीअर्स किंवा अन्य बड्या पदांवर कार्यरत असलेले पदाधिकारी आहेत. या उपक्रमामध्ये सुमित सपकाळ, दीपा सपकाळ, प्रितम फलक, शीतल तायडे, कल्पना गोस्वीमी, नीरु केदाई, आश्विनी तपस्वी, गौरी जोशी, रेश्मी मेंगाळे यांच्यासह सुमारे डझनभर लहान मुलांनी सहभाग घेतला.

साधारण दोन बाय चार फूट आकाराचे वाफे सोसायटीच्या गार्डनमध्ये आखण्यात आले. या मातीमध्ये सोसायटीमध्येच तयार केल्या जाणारे कंपोस्ट खत मिसळण्यात आले. त्यावर मेथी, कोथिंबीर, बीट, गाजर, मुळा, मिरची, टोमॅटो या भाज्यांची लागवड करण्यात आली. सोसायटीमधील वेगवेगळ्या व्यक्तींनी या रोपांची रोज निगा राखण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्याकडून रोपांमधील तण काढून टाकणे, पाणी मारणे अशी कामे रोज केली जात होती. सेंद्रीय पद्धतीने करण्यात आलेल्या या शेतीमधून पालेभाज्या काढण्यात आल्या आहेत.

वाकड येथील पलाश सोसायटीतील सारिका महाले – श्रीखंडे म्हणाल्या, “रोपे कशी उगवितात, त्यांची निगा कशी राखावी लागते, रासायनिक खते न वापरताही छोट्याशा प्रमाणात शेती करता येते, याची शहरांमध्ये वाढणाऱ्या लहान मुलांना माहिती व्हावी, त्यांचा यात सहभाग वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला. ‘पलाश’मध्ये अजूनही अन्य छोटी झाडे लावून हा उपक्रम पुढे असाच सुरू राहणार आहे”

HB_POST_END_FTR-A2

.