Nigdi: घरचा गणपती देखावा, रुपीनगरमध्ये साकारली भक्ती शक्ती समूह शिल्प प्रतिकृती

एमपीसी न्यूज – यंदा शहरातील अनेक मोठ्या गणेश मंडळांना पर्यावरण पूरक देखव्याची भुरळ पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर घराघरांतही पर्यावरणपूरक आकर्षण देखावे पाहायला मिळत आहेत. रुपीनगर मधील पाडुळे कुटुंबाच्या घरी यंदा गणरायाबरोबरच पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान प्रतिकृती देखावा साकारला आहे.

भक्ती शक्ती समूह शिल्पाची संपूर्ण प्रतिकृती पाडुळे कुटुंबाच्या घरी पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या कुटुंबाने या देखाव्यासाठी विविध गुणकारी व औषधी झाडांच्या रोपांचे प्रदर्शन ठेवले आहे. यामुळे गणरायाच्या समोर हा निसर्गरम्य देखावा पहायला मिळत आहे.

स्वच्छ, सुंदर शहर व प्रदूषण , वाहतूक कोंडी मुक्त पिंपरी-चिंचवड शहर हीच इच्छा पाडुळे कुटुंबियांनी गणपती बाप्पाच्या चरणी व्यक्त केली आहे. दरवर्षी गणेशोत्सवात शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे वैशिष्ट्यपूर्ण देखावे साकारणं ही पाडुळे कुटुंबियांची खासियत आहे. यापूर्वी त्यांनी शहरातील वाहतूककोंडी, ओला सुका कचरा नियोजन, बेटी बचाओ संदेश असे सुंदर सामाजिक संदेश देणारे देखावे उभारले होते. शहरातील पर्यावरणाच्या दृष्टीने अभिमानबिंदू असणारे असे प्रकल्प गणेश देखाव्यात हे कुटुंबीय साकार करतात आणि त्याबाबत भक्तांना माहितीही देतात.

भक्ती-शक्ती समूह शिल्प हा देखावा साकारणाऱ्या ज्योती पाडुळे यांनी सांगितले की, ‘पिंपरी-चिंचवड प्रवेशद्वारावर असलेले भक्ती-शक्ती समूह शिल्प हे शहराच्या सौन्दर्यात भर टाकते. माझ्या डोक्यात या संकल्पनेनं आकार घ्यायला सुरुवात केली. आणि अवघ्या पाच दिवसात निसर्गरम्य भक्ती-शक्ती समूह शिल्प देखावा बनवून तयार झाला”

“मी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गोष्टी या देखाव्यासाठी वापरल्या आहेत. लहान मुलांची खेळणी तसेच या देखाव्यासाठी वापरण्यात आलेल्या झाडांचे पुन्हा परिसरातील मोकळ्या जागेत या रोपांचे रोपण करणार आहे, असे मराठवाडा युवा मंचाचे उपाध्यक्ष औदुंबर पाडुळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.