Lonavala : शहरात लाॅकडाऊन संपेपर्यत केवळ चार तासच दुकाने खुली राहणार : नगरपरिषदेचा निर्णय

एमपीसी न्यूज : बाजारपेठेतील गर्दी टाळण्याकरता लोणावळा नगरपरिषदेने भाजीपाला, फळे, किराणा व मटण चिकनची दुकाने १ मे पासून लाॅकडाऊन संपेपर्यत आठवड्यातील ठरावीक दिवशी केवळ चार तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

१ मे पासून लाॅकडाऊन संपेपर्यत शहर‍ातील किराणा मालाची दुकाने रविवार, मंगळवार व गुरुवार सकाळी 9 ते दुपारी 1 दरम्यान सुरु राहतील. चिकन, मटन व मासे ही दुकाने रविवार, बुधवार व शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 1 दरम्यान सुरु राहतील तर भाजीपाला व फळांची दुकाने शुक्रवार व शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत सुरू राहतील असे परिपत्रक लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी आज प्रसिध्द केले.

मुंबई व पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. लोणावळा शहराला लागून असलेल्या खोपोली शहरात व मावळातील देहूरोड शहरात कोरोना रुग्ण सापडल्याने लोणावळा प्रशासनाने बाजारपेठेतील गर्दी टाळण्याकरता कडक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. लोणावळ्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, याकरिता शहरात येणार्‍या सर्व रस्त्यांवरील चेकपोस्ट नाक्यावर वाहन तपासणी कडक केली असून अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई मोहिम हाती घेतली आहे.

नागरिकांना लाॅकडाऊनचे पालन करावे, नागरी सुविधेकरिता घरपोच माल पुरविण्याची सुविधा लोणावळा नगरपरिषदेने सुरू केली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, घरपोच सेवा सर्व दिवस सुरू राहणार आहे, असे मुख्याधिकारी पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.