Pimpri: केंद्र सरकारच्या आदेशाची अमंलबजावणी करत कामगार, विद्यार्थी, यात्रेकरुंना घरी सोडा -यशवंत भोसले

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने विविध राज्यांमध्ये अडकलेले कामगार, विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ घरी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने विविध भागात अडकलेल्या कामगार, मजूर, विद्यार्थी, यात्रेकरुंना त्यांच्या घरी सोडावे, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी आज (गुरुवारी) ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून केली आहे.

यशवंत भोसले म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन झाल्यामुळे लाखो कामगार विविध राज्यात अडकून पडले होते. या कष्टकरी, श्रमिक, मजूर कामगारांचे मोठ्या प्रमाणावर हाल होऊ लागले होते. त्यामुळे आपण राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून रस्त्यातच अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाऊ द्यावे, अशी मागणी करत होतो. या संदर्भात सरकार व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून केंद्र शासनाने आता या कामगारांना आपापल्या घरी जाण्यास परवानगी दिली आहे.

कोरोनामुळे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. देशातील विविध राज्यात लाखो कामगार, मजूर अडकून पडले होते. या कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळली होती. या कामगारांना त्यांचे वेतनही उद्योजकांनी दिले नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होऊ लागली होती. अनेक ठिकाणी दहा बाय दहाच्या खोलीत पंधरा-वीस कामगार अडकून पडले होते. मात्र, उपाशीपोटी शासन आदेशाचे ते पालन करत होते. त्यांना उपासमारीने मरण्याची वेळ आली असल्याने या कामगारांना वेतन देण्याची विनंती आपण सातत्याने करत होतो.

कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन केव्हा उठणार हे सांगता येत नाही. त्यामुळे कंत्राटदारीवरील कामगारांचे तसेच रोजंदारीवरील कामगारांचे वेतन त्वरित दिले जावे अशी मागणी आपण वारंवार केली आहे. कामगार आयुक्त यांनी तसे आदेशही काढले; मात्र काही उद्योजकांनी कामगारांना वेतन न देता त्यांना देशोधडीला लावले आहे.

एककाळ या देशात देशावर प्रेम करणार्‍या रतन टाटा, शंतनुराव किर्लोस्कर, फिरोदिया यासारखे उद्योजक होते. परंतु दुर्दैवाने असे उद्योजक राहिले नाहीत. स्वतःच्या फायद्यासाठी कामगारांना देशोधडीला लावून, कामगारांना रस्त्यावर टाकल्या सारखी अवस्था या उद्योजकांनी करून ठेवली आहे असेही भोसले यावेळी म्हणाले.

कामगारांना आपापल्या गावी जाताना जर आपले वेतन मिळाले नसेल. तर अप्पर कामगार आयुक्त यांना त्वरित संपर्क साधून तक्रार नोंदवावी. अथवा राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडे या संदर्भात तक्रार दिली जावी. या तक्रारीत कंपनीचे नाव, ठेकेदार असल्यास ठेकेदाराचे नाव व कामगारांची संख्या नमूद केली जावी, असे सांगून यशवंत भोसले म्हणाले की, कामगारांचे वेतन त्यांना मिळावे यासाठी जिल्हाधिकारी यांनाही अधिकार दिले असल्याने त्यांच्याकडे तक्रार केली तरीही चालू शकणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.