New Delhi : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून घरी सोडले, कोरोना चाचणीही ‘निगेटीव्ह’

New Delhi: Former Prime Minister Dr. Manmohan Singh discharged from hospital, corona test 'negative'

एमपीसी न्यूज – देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंह यांना आज (मंगळवारी) नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. अचानक छातीत दुखू लागल्याने रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या उपचारादरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांची कोरोना निदान चाचणीही करण्यात आली. तिचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे सांगण्यात आले. 

डॉ. मनमोहन सिंह यांना कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते, मात्र चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत होते.

डॉ. मनमोहन सिंह रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांची प्रकृती ठीक व्हावी, यासाठी प्रार्थना सुरु केल्या होत्या. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यासाठी आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या अनेक पोस्ट होत होत्या. देशातील बड्या राजकीय नेत्यांनीही ट्वीट करुन मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली होती.

डॉ. मनमोहन सिंह हे भारताचे 13 वे पंतप्रधान आहेत. त्यांनी सलग दहा वर्ष 2004 ते 2014 देशाची सेवा केली आहे. डॉ. मनमोहन सिंह हे अर्थतज्ज्ञही आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 15 वे गव्हर्नर म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला आहे. जून 1991 पासून 1996 पर्यंत पी. व्ही नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते. सध्या डॉ. मनमोहन सिंह राज्यसभेचे खासदार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.