Senior Actress Ashalata no more : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – रंगभूमी आणि चित्रपटविश्वात आपल्या संयत अभिनयाने वेगळा ठसा उमटवणा-या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले आहे.

त्या ७९ वर्षांच्या होत्या. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथंच आज सकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशालता यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र कोविड न्यूमोनियामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

महाराष्ट्राची ‘मत्स्यगंधा’ म्हणून नाट्यरसिकांना परिचित असणा-या आशालता या मूळच्या गोव्याच्या होत्या. गोड गळा आणि देखणे व्यक्तिमत्व असलेल्या आशालता यांनी रंगभूमीवर पदार्पण करताना त्यावेळी मैलाचा दगड ठरलेल्या वेगळा ठसा उमटवणा-या ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकात त्यांनी सत्यवतीची भूमिका अतिशय चोखपणे वठवली होती. त्यानंतर ‘गुंतता हृदय हे’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘वा-यावरची वरात’ अशा नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं नामांकनही मिळालं होतं.

मराठी चित्रपटसृष्टीत ‘उंबरठा’, ‘सूत्रधार’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘वहिनीची माया’, ‘माहेरची साडी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.  त्यांनी विविध भाषांतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. छोट्या पडद्यावरील अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या. आशालताताईंनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. या शिक्षणाचा त्यांना अभिनय क्षेत्रातही उपयोग झाला होता. संगीत विषयावर आधारित ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं. गणपतीच्या उत्सवात गाजणारी एक वेगळी आरती म्हणजे ‘तू सुखकर्ता, तू दुखहर्ता, विघ्नविनाशक मोरया’ ही आशालता यांनीच गायलेली होती. ‘मत्स्यगंधा’ नाटकातील त्यांनी गायलेल्या ‘गर्द सभोती रान साजणी’ या गाण्याने पण एक काळ गाजवला होता.

काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. मात्र या सेटवर त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर 5 दिवस साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.

‘गेले 5 दिवस त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोविड अति दक्षता विभागात व्हेंटिलेटर वर होत्या, परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही’, अशी माहिती अतिदक्षता विभागतज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.