जुन्या पुणे-नाशिक रस्त्याच्या उर्वरित कामास अखेर सुरुवात; नागरिकांतून समाधान

एमपीसी न्यूज – चाकणमधील जुन्या पुणे-नाशिक रस्त्याचे अमीर थिएटरपासून राहिलेल्या कामास रविवार (दि.5) पासून सुरुवात झाल्याने चाकण मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. उर्वरित जुन्या पुणे-नाशिक रस्त्याच्या अमीर टॉकीज (जय महाराष्ट्र चौक) ते मार्केटयार्ड दरम्यानच्या या कामास 56 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.  

चाकणमधील जुन्या पुणे-नाशिक रस्त्याचे अर्धवट काम झाल्याने उर्वरित रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्यावरून शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व वाहने यांची मोठी वर्दळ असते. चाकणमधील जुन्या पुणे-नाशिक मार्गाचे काम अर्धवट मार्गी लागल्याने अमीर थिएटरपासून पुढे दुरावस्थेतील हा रस्ता राजकीय सुंदोपसुंदीमध्ये तसाच राहिला होता. तालुक्याच्या तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे उर्वरित रस्त्याचे काम विरोधकांनी पूर्ण करून दाखवावे असे खुले आव्हान दिले होते.

अर्धवट रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद करणे कठीण असल्याने हा रस्ता होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या रस्त्याचे अर्धवट काम झाले. मात्र, उर्वरित रस्त्याचे काम रखडलेले होते. त्यानंतर तालुक्याच्या सध्याच्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या उर्वरित कामासाठी शासनाकडून निधीची तरतूद केली. सुरुवातीला माणिक चौक ते मुटकेवाडी दरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर अमीर टॉकीज (जय महाराष्ट्र चौक) ते मार्केटयार्ड दरम्यानच्या कामास रविवारपासून सुरुवात झाली आहे.

शहरात नेमक्या ज्या भागात रस्त्याचे काम रखडले होते तेथून पुढील भागातच चाकणमधील सर्वात मोठे शिवाजी विद्यालय, त्यापुढे तरकारी बाजार व मार्केटयार्ड व मोठ्या प्रमाणात वर्दळ असणारा भाग होता. आता प्रत्यक्षात या रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.