Pimpri: ‘रिंग’मध्ये आयुक्तांचा सहभाग ?, आयुक्तांची चौकशी करा, ‘सीएम’कडे भाजप नगरसेवकाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने काढलेल्या विकास कामांच्या निविदांमध्ये ‘रिंग’ केली जात आहे. पुरावे देऊन आयुक्त ‘रिंग’ झाली नसल्याचा दावा करतात. ‘रिंग’ मध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करत त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नगरसेवक तुषार कामठे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून निविदांमध्ये ठेकेदारांनी संगनमत (रिंग) केले आहे. रिंगमध्ये महापालिका अधिकारी सहभागी आहेत. त्यांच्या सहकार्यानेच ‘रिंग’ चालू आहेत. यामुळे करदात्या नागरिकांचे नुकसान होत आहे. ठेकेदार आणि रिंगमधील अधिका-यांना मोठा लाभ होत आहे.

निविदा काढताना भांडार विभाग आणि स्थापत्य विभाग अनेक जाचक नियम व अटी निविदेमध्ये टाकतात. त्यामुळे सर्वसामान्य ठेकेदारांना निविदा भरणे अशक्य होते. नेहमीचे रिंग करणारे 5 ते 6 ठेकेदार या अटींमध्ये बसतात. त्यामुळे अपोआपच रिंग होते. याबाबत अनेकदा आयुक्तांना पुराव्यासह निवेदने देऊन रिंगमध्ये सहभागी अधिका-यांवर, ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली. त्याबाबस स्मरणपत्र दिले. पाच वेळा पुराव्यासह निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.

आयुक्तांनी आमच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. त्याउलट आयुक्त हर्डीकर यांनी शहरात कोणत्याच कामामध्ये ‘रिंग’ झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले. हा खूप मोठा विरोधाभास आहे. रिंग प्रकरणात आयुक्तांचे आर्थिक हितसंबंध आहेत का ?, याची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी. आयुक्तांनी करदात्या नागरिकांचे पैसे वाचविण्यापेक्षा ठेकेदारांना कसा आर्थिक लाभ होईल. याकडे अधिक दिले आहे. सखोल चौकशी करुन आयुक्त हर्डीकर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी कामठे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.