Dehu News : अभंग स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

शाळेचा प्रथम वार्षिक अंक 'सृजनदीप' चे प्रकाशन

एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र देहू येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेच्या प्रथम वार्षिक अंक ‘सृजनदीप’ चे प्रकाशन करण्यात आले. शनिवारी (दि.09) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी विचारवंत अनंत पद्मनाभन, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे, महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ पत्रकार सुनील लांडगे, देहू वि.का.स. सोसायटीचे चेअरमन अभिमन्यू काळोखे, ज्योतिषतज्ञ दत्तात्रेय अत्रे, वसंतराव झेंडे, देहू देवस्थानचे माजी विश्वस्त रामभाऊ मोरे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष ॲड. संजय भसे, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवी शेटे, संपतराव शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या नावाप्रमाणेच या शाळेचे विद्यार्थी आपल्या ज्ञानाने संस्थेचा नावलौकिक अभंग करतील असे मत श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी याप्रसंगी व्यक्त केले. मुलांनो तुम्ही नेहमी खरे बोला, कोणाला फसवू नका तसेच शिक्षकांनी नितीमूल्यांचे संस्कार करून मुलांना घडवावे असे मनोगत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, विचारवंत अनंत पद्मनाभन यांनी व्यक्त केले.

वर्षभर राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती पालकांना मिळावी, मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी व मुलांनी देखील लवकर लिहिते व्हावे या भावनेतून दरवर्षी सृजनदीपची निर्मिती केली जाईल असे मत संस्थेचे सचिव प्रा. विकास कंद व प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी मांडले.

सांस्कृतिक कार्यक्रमात या पिढीला स्वातंत्र्याचे मोल पून्हा एकदा समजावे, स्वातंत्र्यसंग्राम पुन्हा एकदा माहिती व्हावा, म्हणूनच हा इतिहासजमा झालेला इतिहास अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिवंत करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य लढ्यातील काही ठळक घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली महात्मा गांधींची दांडी यात्रा ही या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरली. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी झाशीच्या राणीचा प्रतिकार, भारताची विविधता, कृषिप्रधान भारत आपल्या नृत्यातून साकारीत उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाही सृजन फाउंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहशिक्षिका प्राची पोटावळे व वृषाली आढाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.