Pimpri : आचार्य अत्रे रंगमंदिरावर उधळपट्टी, 45 लाखांचा वाढीव खर्च

पुन्हा 'तोच' प्रस्ताव स्थायी समितीसमोर

एमपीसी न्यूज – पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरावर नुतनीकरणाची उर्वरीत कामे करण्याच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी केली जात आहे. नुतनीकरणासाठी 45 लाखांच्या वाढीव खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.12) स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. दरम्यान,  16 सप्टेंबर 2019 रोजी स्थायी समितीने हा प्रस्ताव 14 आठवडे तहकूब केला होता. आता पुन्हा तोच प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला आहे.

संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या वातानुकुलित यंत्रणेसह इतर दुरुस्ती आणि बदलांसाठी नोव्हेंबर 2017 पासून हे रंगमंदिर बंद ठेवण्यात आले होते. अत्रे सभागृहाच्या विद्युतीकरणाच्या कामाला वेळ लागल्याने नूतनीकरणाचे काम रखडले होते. काही दिवसांपूर्वी आचार्य अत्रे रंगमंदिर खुले करण्यात आले.

महापालिकेने रंगमंदिरातील बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, फ्लोरिंग, साउंड सिस्टीम, रेस्टरूम, वातानुकुलित यंत्रणा, व्हीआयपी रूमचे सुशोभीकरण या कामांवर 4 कोटी 76 लाख रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, 99 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत 1 टक्के कामासाठी 45 लाखांच्या वाढीव खर्चाचा घाट घालण्यात आला आहे.

देव कन्स्ट्रक्‍शन यांना रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम देण्यात आले होते. या प्रकल्पाच्या वास्तू विशारदाने काम सुरू असताना छताच्या कामात बदल सुचविले. परिणामी, अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या दरात तफावत निर्माण झाली. त्यामुळे नूतनीकरणाची उर्वरीत कामे अपूर्ण असून ती पुर्ण करण्यासाठी 45 लाख वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.