Pune : एसटी स्टँडवरील रिक्षा स्थानकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानक येथे होणा-या वाहतूककोंडीमुळे वाहतूक पोलिसांनी दोन्ही ठिकाणची रिक्षा स्टॅड बंद केली आहेत. रिक्षा स्टँडमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने ही कारवाई केल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी कोणत्याही रिक्षाचालक तसेच संघटनेला विश्वासात न घेता ही अधिकृत रिक्षा स्टँड बंद केली आहेत, असा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे. शिवाजीनगर आणि स्वारगेट एसटी स्थानकांबाहेर अनेक वर्षांपासून अधिकृत रिक्षा स्टँड आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांनी अचानकपणे ही रिक्षा स्टँड बंद केली आहेत. त्यामुळे तेथील रिक्षा व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. तसेच, ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे, असे रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मेट्रोच्या कामासाठीच वाहतूक पोलिसांचा हा खटाटोप सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

शिवाजीनगर व स्वारगेट एसटी स्थानकांबाहेरील रिक्षा स्टँडमुळे वाहतूककोंडी होते. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. पालिकेने या रिक्षा स्टँडसाठी पर्यायी जागा देणे अपेक्षित आहे. पालिकेने दिलेल्या जागेवर रिक्षा स्टँडमुळे वाहतूककोंडी होत नसेल, तर आम्ही ना हरकत प्रमाणपत्र देऊ, असे वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.