Pune : विमानतळे पूर्ण सुरक्षित- टी. सी. सजीत

अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस आयोजित 'चेकमेट 2019'

एमपीसी न्यूज- भारतीय विमानतळाची सुरक्षा डोळ्यात तेल घालून, पूर्ण जबाबदारीने राखली जात असून विमानतळे पूर्ण सुरक्षित आहेत असे प्रतिपादन बंगळुरू विमानतळाचे मनुष्यबळ विकास विभागाचे मुख्यधिकारी टी सी. सजीत यांनी केले.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस आयोजित ‘चेकमेट २०१९’ : आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी सजीत बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार अध्यक्षस्थानी होते. अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ‘चे संचालक आर . गणेसन यांनी स्वागत केले. सामाजिक योगदानाबद्दल एस. मुरलीधरन यांना ‘जीवनगौरव ‘पुरस्कार देण्यात आला. परिषदेचे हे 11 वे वर्ष होते. परिषदेत सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधांचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

टी. सी. सजीत म्हणाले, “भारतीय विमानतळाची सुरक्षा डोळ्यात तेल घालून, पूर्ण जबाबदारीने राखली जात आहे. विमानतळे पूर्ण सुरक्षित आहेत. प्रत्येक प्रवेशावर नजर ठेवली जाते. सुरक्षिततेचे नियम कडक करण्यात आले आहेत. त्यासाठी मानवी सुरक्षेबरोबर अत्याधुनिक तंत्राचा अवलंब केला जात आहे. सध्या 6 विमानतळांची जबाबदारी खासगीकरणातून देण्यात आली आहे. भावी काळात 140 विमानतळे खासगी होणार आहेत. दोन हजार विमाने देशात पुढील सात वर्षात उपलब्ध होत आहेत. अत्याधुनिक व्यवस्थापन तंत्रे पाहता व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांना कारकिर्दीच्या संधी उपलब्ध होत असून व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने तयारी करावी”

​डॉ. पी. ए इनामदार म्हणाले, “गेल्या पाच हजार वर्षात झाली नव्हती इतकी प्रगती स्वातंत्र्योत्तर काळात झाली आहे. त्याबाबत न्यूनगंड बाळगण्यासारखी वस्तुस्थिती नाही. व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन घेऊन जगात नवी आव्हाने पेलली पाहिजेत”​

उद्योग जगतातील अनेक मान्यवर, संशोधक, व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी, प्राध्यापक या परिषदेत सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.