Lonavala : ‘चला हवा येऊ द्या’च्या व्यासपीठावरून इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाची जनजागृती

समाज प्रबोधनाकरिता लोणावळ्यात थुकरटवाडी कलाकारांचा हास्यकल्लोळ

एमपीसी न्यूज- नमामी इंद्रायणी (चंद्रभागा) नदी स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्याकरिता लोणावळा शहरात ‘चला हवा येऊ द्या’ या प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मावळ प्रबोधनी, लोणावळा नगरपरिषद व मावळ वार्ता फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते. थुकरटवाडीच्या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोणावळा व मावळवासीयांना नदी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. लोणावळा व मावळ भागातील जवळपास 25 हजार नागरिकांच्या उपस्थितीमध्ये चला हवा येऊ द्या चा हा कार्यक्रम पार पडला.

वारकरी सांप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या इंद्रायणी (चंद्रभागा) नदीचा उगम लोणावळ्याजवळील नागफणीच्या डोंगरातून होतो. या डोंगरावर पापमोचन तपश्चर्या करत असताना देवराज इंद्र यांच्या हातातील कमंडलू मधून सांडलेल्या पाण्यातून या इंद्रायणी नदीचा उगम झाला अशी अख्यायिका नाथग्रंथात स‍ांगितली आहे. अशा या पवित्र इंद्रायणीला सध्या जलपर्णीचा विळखा पडला असून नदीपात्रात साचलेला गाळ व अतिक्रमणे यामुळे नदीपात्र लहान व उथळ बनले असून ड्रेनेज लाईनमुळे नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे.

नदीपात्राची या सर्व विळख्यातून सुटका करण्याकरिता मावळ प्रबोधनी, लोणावळा नगरपरिषद व मावळ वार्ता फाऊंडेशन या संस्थांनी पुढाकार घेतला असून दिड महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. उगमस्थान ते भांगरवाडी दरम्यान नदीपात्रातील जलपर्णी काढण्यात आली असून पात्रातील गाळ व दगड काढत पात्राला पिचिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. स्वच्छतेच्या या महायज्ञात लोकसहभाग महत्वाचा असल्याने लोणावळा व मावळवासीयांमध्ये जनजागृती करण्यासाठी मावळ प्रबोधनीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे शनिवारी येथील पुरंदरे मैदानावर आयोजन केले होते. 25 हजारांहून अधिक रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला तर हजारो नागरिकांना जागे अभावी माघारी जावे लागले.

इंद्रायणी नदीची विधिवत पूजा व आरती करत सदर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय पांडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, लोणावळ्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळातील ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे व दादा जांभुळकर, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष हभप रोहिदास महाराज धनवे, सभापती सुर्वणा कुंभार, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम हे मान्यवर उपस्थित होते.

लोणावळा शहरातून उगम पावणारी इंद्रायणी नदी आळंदीनंतर भीमा नदीत व पुढे चंद्रभागेत विलिन होऊन पांडूरंग परमात्याच्या चरणी लीन होते, या नदीला अनन्य साधारण महत्व असल्याने प्रत्येकाने नदी स्वच्छता अभियानात खारीचा वाटा उचलावा असे आवाहन यावेळी मावळ प्रबोधनीचे संस्थापक रवींद्र भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, म‍ावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष जितुभाई टेलर, कार्याध्यक्ष किरण गायकवाड, राजेंद्र चौहान, विनय विद्वांस, रघुवीर शेलार, अमोल शेटे, विनित भेगडे, बाळासाहेब फाटक, रमेश पाळेकर, नंदकुमार वाळंज, संजय आडसुळे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

यावेळी नदी स्वच्छता अभियानाला मदत करणार्‍या नागरिक व संस्थ‍ांचा संयोजक‍ांच्या वतीने सन्मान करण्यात आला. मावळ प्रबोधनी व मावळ वार्ता फाऊंडेशनचे सदस्य लोणावळा नगरपरिषदेचे नगरसेवक व विविध गावांचे सरपंच तसेच पदाधिकारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.