Alandi Crime : कामावरून काढलेल्या 32 कामगारांनी कंपनीतील अधिकाऱ्याला कंपनीच्या गेटवर अडवून धमकावले

एमपीसी न्यूज – कंपनीतील कामावरून काढून टाकलेल्या 32 कामगारांनी मिळून कंपनीतील एका अधिकाऱ्याला अडवून दमदाटी केली. आमच्या व्यतिरिक्त कंपनीत कामगार भरती करायची नाही असे म्हणत अधिकाऱ्याकडून ‘या कामगारांना कामावरून काढून टाकले नाही’ असे कोऱ्या कागदावर लिहून घेतले.

हा प्रकार 27 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता मरकळ येथील पुणे हिंदुस्थान प्रेसिंग प्रा. ली. कंपनीच्या गेटसमोर घडला.

विलास विजय गाडे (वय 24, रा. भोसरी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 2) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर राजेंद्र पाटील, सतीश बाबुराव पवार, पांडुरंग विठ्ठल वर्पे, राम गोरख चव्हाण, अक्षय वसंत चौधरी, सुनील हिरामण चौधरी, अनिल चव्हाण आणि अन्य 20 ते 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या कंपनीत काम करतात. आरोपींना कंपनीतून कामावरून काढले आहे. त्या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत करून 27 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता फिर्यादी यांना अडवले. तुमच्याशी बोलायचे आहे म्हणून त्यांना बाजूला नेऊन दमदाटी केली.

‘आमच्या व्यतिरिक्त कंपनीत कामगार भरती करायची नाही. नवीन भरती केली तर तुझे कामावर येणं-जाणं बंद करून टाकेन’ अशी धमकी देत फिर्यादी यांच्या कोऱ्या कागदावर लिहून घेतले की, ‘या कामगारांना कामावरून काढून टाकले नाही’. या संपूर्ण प्रकारचा आरोपींनी व्हिडीओ बनवला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.