Alandi Crime News : देवाच्या आळंदीत मृदंग शिकण्यासाठी जाणाऱ्या 11 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; एकास अटक

एमपीसी न्यूज – मृदंग शिकवणाऱ्या एका व्यक्तीने मृदंग शिकण्यासाठी येणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थी मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. ही घटना 14 मे रोजी दुपारी देवाच्या आळंदीत घडली. याबाबत 17 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शिवप्रसाद रामनाथ भोकनळ (रा. सिद्धबेट येथील श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था आळंदी, ता. खेड. मूळ रा. वडांगळी, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलाच्या 35 वर्षीय वडिलांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुटुंब हिंगोली येथून कामाच्या शोधत आळंदी येथे वास्तव्यास आले होते. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी दररोज काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तर त्यांच्या 11 वर्षीय पीडित मुलाला मृदंग शिकण्याची आवड होती. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्या मुलाला सिद्धबेट येथील श्री माऊली वारकरी शिक्षण संस्थेत मृदंग शिकण्यासाठी पाठवले होते. त्या संस्थेत आरोपी मृदंग शिकवण्याचे काम करत होता.

त्यातूनच आरोपीने 11 वर्षीय विद्यार्थ्यावर 14 मे रोजी दुपारी दोन ते तीन वाजताच्या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. याबाबत मुलाने घरी सांगितल्यानंतर त्याच्या वडिलांनी तात्काळ पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अजय लोहेकर तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.