Alandi Crime News: चापट मारल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून मित्राचा खून

एमपीसी न्यूज – जेवण करत असताना शिवी दिल्याने चापट मारल्याचा रागातून मित्राने मित्राच्याच डोक्यात दगड मारुन खून केला. ही घटना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि.9)  रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.

प्रफुल्ल संपत गायकवाड (वय 27, रा. आळंदी, मूळ  फलटण, सातारा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दीपक दिगंबर भिमटे (वय 23,  रा. आळंदी, मूळ नागपूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत  संतोष रामचंद्र निंबाळकर (वय 42, रा. माळवाडी, गणेश मंदीर शेजारी, सोळु, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव यांनी माहिती दिली.

आरोपी दीपक आणि मयत प्रफुल्ल एकमेकांचे मित्र होते. ते दोघेही फिर्यादी निंबाळकर यांच्याकडे कामाला होते. दीपक आणि प्रफुल्ल शुक्रवारी रात्री जेवण करत होते.   दीपक याने प्रफुल्लला  शिवी दिली. त्यामुळे प्रफुल्ल याने दीपक याला चापट मारली. त्यातून दोघांमध्ये वाद झाला.

प्रफुल्ल हा पळून जात असताना दीपकने पाठीमागून प्रफुल्ल याला दगड मारला. त्यामुळे प्रफुल्ल खाली पडला. त्यानंतरही दीपक याने  प्रफुलच्या डोक्यात दगड मारला. यात प्रफुल्लचा मृत्यू झाला.

आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.