Alandi : जमीन बळकावण्यासाठी वृद्धेचे अपहरण आणि फसवणूक

एमपीसी न्यूज – वडिलोपार्जित जमिनीसाठी न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी एका अशिक्षित वृद्धेचे अपहरण करून दमदाटी करीत तिची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नातेवाईक, बांधकाम व्यावसायिक आणि वकिलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्वती शंकर ऊर्फ बबन भाडाळे (वय 68, रा. पंडित दौंडकर यांची खोली, देवाची आळंदी, ता. खेड) यांनी गुन्हे शाखेत याबाबत फिर्याद दिली असून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील शंकर बांदल, पुराणिक बिल्डर प्रा. लि., पोंक्षे वकील आणि इतर साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्वती भाडाळे यांची बावधन येथे वडिलोपार्जित आहे. या जमिनीचे वाटप झाले नसतानाही पार्वती आणि त्यांची मामे बहीण शैलाबाई कुऱ्हे यांची संमती न घेता पुराणिक बिल्डर प्रा. लि. यांना जमिनीची परस्पर विक्री केली. याबाबत पार्वती आणि शैलाबाई यांनी मालकी हक्‍काबाबत न्यायालयात दावा दाखल केला. पार्वती यांना मूलबाळ नसल्याने शैलाबाई यांचा मुलगा गणेश कुऱ्हे त्यांची देखभाल करतो. तसेच न्यायालयाचे कामही तोच पाहतो.

पार्वती या आळंदी येथील घरी असताना 12 सप्टेंबर रोजी त्यांचा मामेभाऊ सुनील बांदल घरी आला. गणेश कुऱ्हे हा मुंबईला गेला असून त्याने मला तुला शिवाजीनगर येथील न्यायालयात न्यायला सांगितले असल्याचे खोटे सांगून जबरदस्तीने मोटारीतून न्यायालयात नेले. 27 सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयीन कामासाठी पार्वती यांना नेण्यासाठी सुनील आला असता त्यांनी येण्यास नकार दिला. त्यावेळी सुनील याने पार्वती यांना दमदाटीही केली.

पार्वती या अशिक्षित असल्याने त्यांच्या काही कागदांवर स्वाक्षरी घेतल्या. असे त्याने दोनवेळा केले व न्यायालयातून दावा मागे घेण्यासाठी खोटे तडजोड व प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक येथे धाव घेऊन फिर्याद दिली. गुन्हे शाखा याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.