Alandi : कामावर निघालेल्या पोलिसाला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – रात्रपाळीसाठी रात्रपाळीसाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून लुटल्याच्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाने तिघांना अटक केली.  पोलीस कर्मचाऱ्याला लुटण्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 21) रात्री साडेआठच्या सुमारास आळंदी येथील रासे गावालगत घडली होती. 

अश्विन अरुण रोकडे (वय 25), शाहरुख इजाजखान पठाण (वय 22), प्रतीक योगीराज खडसे (वय 21, तिघे रा. शिक्रापूर रोड, चाकण. मूळ रा. वाशीम) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इंद्रकुमार तुकाराम धोत्रे (वय 30, रा. आळंदी) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी धोत्रे यांना मंगळवारी रात्रपाळी असल्याने ते दुचाकीवरून आळंदी येथून चाकणकडे येत होते. दरम्यान, आळंदी घाटात रासे गावाजवळ तिघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. आरोपींनी धोत्रे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच धोत्रे यांच्या खिशातील चार हजारांची रोकड आणि मोबाईल असा नऊ हजारांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर आरोपींनी त्यांना रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

रस्त्याने जाणाऱ्या एका पोलिसाने धोत्रे यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला पडलेली बघितली. त्यानंतर धोत्रे यांचा शोध घेतला असता धोत्रे रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडलेले आढळून आले. त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. धोत्रे यांच्यावर आता एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाने तिन्ही आरोपींची माहिती काढली. त्यांच्या शोधत तीन पथके देखील रवाना केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांना माहिती मिळाली की, तिन्ही आरोपी रात्री चोरलेल्या मोबाईलला विकण्यासाठी गिऱ्हाईक शोधत आहेत. तए सध्या चाकण येथे मोटारसायकलवरून ट्रिपल सीट फिरत आहेत. पोलिसांनी शिक्रापूर रोडने येणाऱ्या एका संशयित मोटारसायकलला थांबवले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले. त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा एकूण 30 हजारांचा ऐवज जप्त करत आरोपींना पुढील तपासासाठी चाकण पोलिसांकडे देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, शंकर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक गिरीश चामले, सहाय्यक फौजदार विजू कांबळे, पोलीस कर्मचारी पठाण, सानप, चव्हाण, विवेकानंद सपकाळे, नितीन पराळे, यदु आढारी, नाथक केकान, योगेश कोळेकर, सचिन मोरे, त्रिनयन बाळसराफ, सागर जैनक, राज हणमंते, प्रमोद ढाकणे, महेश भालचिम, शशिकांत नांगरे, अरुण साबळे, अमोल साकोरे, सचिन उगले, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.