Talegaon : दूरदर्शनमुळे कलाकार गावोगावी, तर गावातले कलाकार जगभर पोहोचले – राजन भिसे

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचा १४ वा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज – दूरदर्शनमुळे कला आणि कलाकार गावोगावी पोहचले, तर गावातील कला आणि कलाकार जगभर पोहचली, असे मत सुप्रसिद्ध सिने नाट्य कलाकार आणि नेपथ्यकार राजन भिसे यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचा १४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या वर्षी मालिका कलाकार संकर्षण कऱ्हाडे (आम्ही सारे खवय्ये) व श्रेया बुगडे (चला हवा येऊ द्या ) यांना कलागौरव पुरस्काराने तर लिटील चॅम्प सारेगम फेम कार्तिकी गायकवाडला प्रेरणा पुरस्काराने राजन भिसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी वस्तू व सेवाकर विभागाचे वरिष्ठ उपायुक्त सुनील काशीद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, नाट्यपरिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव धोत्रे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, तेजस धोत्रे, उपाध्यक्ष हरिश्चंद्र गडसिंग, उद्योजक चंद्रकांत भिडे आदी उपस्थित होते.

वर्धापन दिन समारंभाची सुरुवात मीनल कुलकर्णी यांच्या सृजन नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या बहारदार नांदीने झाली व त्यानंतर तळेगावच्या सांस्कृतिक चळवळीत महत्वाचे योगदान दिलेल्या गान तपस्वी पंडित शरदराव जोशी आणि शिक्षक संघाचे माजी आमदार पंडित तु.ना.माताडे (नाना), देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. रमेश दत्तोबा पाचंगे यांच्या चौघडा वादनाने रंगत आणली.

आपले मनोगत व्यक्त करताना कार्तिकी गायकवाड व श्रेया बुगडे यांनी हा पुरस्कार आम्हाला पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायक ठरणार असल्याचे सांगितले. मोठ्या आणि प्रथितयश कलाकारांचा गौरव तर नेहमीच होतो. पण मोठे होऊ पाहणाऱ्या छोट्या आणि नवोदित कलाकारांचा केलेला गौरव हा आमच्या मनाला खूप आनंद देणारा आहे, असे मत संकर्षण कऱ्हाडे यांनी व्यक्त केले. त्यांनी त्यांना आलेले अनुभव सांगून स्वरचित कविता ऐकवत रसिकांना भारावून टाकले.

या समारंभाचे स्वागत साप्ताहिक अंबरचे संपादक व तळेगाव नाट्यपरीषदेचे विश्वस्त सुरेश साखवळकर यांनी केले; तर प्रास्ताविक सुरेशराव धोत्रे यांनी केले. तळेगावाच्या सांस्कृतिक चळवळीला सुसज्ज नाट्यगृहाची नितांत गरज आहे, त्यासाठी विद्यमान आमदार बाळा भेगडे यांनी लक्ष घालावे व तळेगावकर रसिकांची मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या समारंभाचे सूत्रसंचालन अलकनंदा माताडे, सारंग माताडे, राजेश बारणे यांनी केले तर निवेदन अनिल धर्माधिकारी यांनी केले. हरिश्चंद्र गडसिंग यांनी आभार मानले. समारंभाचा शेवट कार्तिकी गायकवाडच्या सुरेल आवाजातील पसायदानाने झाला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष साखरे, डाॅ. मिलिंद निकम, सुरेश दाभाडे, संविद पाटील, अनिल धर्माधिकारी, मिथिल धोत्रे, राजेश बारणे, सारंग माताडे, समीर नरवडे, नगरसेविका शोभा भेगडे, शरयू देवळे, निरंजन जहागीरदार, भरत छाजेड, मधुकर शिंदे, अॅड निवृत्ती फलके, शाहीन शेख, सविता करणकोट, विवेक क्षीरसागर, विश्वास देशपांडे यांनी विशेष मेहनत घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.